कलाकारांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याची मागणी
पणजी :
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे गोवा सांस्कृतिक धोरण 2007 आणि गोवा क्रीडा धोरण 2009 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करून कलाकारांना नोकरीत आरक्षण देण्याची मागणी केली. सांस्कृतिक क्षेत्रात प्रतिभावान विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्सची तरतूद लागू करण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात विरोधी पक्षनेत्यांनी गोवा सांस्कृतिक धोरण 2007 आणि गोवा क्रीडा धोरण 2009 ची सुरुवात कला आणि संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रातील स्थानिक प्रतिभांना प्रोत्साहन देण्यासाठी काँग्रेस सरकारने केली होती याचा उल्लेख केला आहे.या धोरणांमध्ये सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिभावान विद्यार्थी आणि खेळाडूंसाठी ग्रेस मार्क्सची तरतूद आहे. कलाकार आणि खेळाडूंना नोकरीत आरक्षण या दोन्ही धोरणांमध्ये तरतूद असल्याचे युरी आलेमाव यांनी पत्रात नमूद केले आहे. 2012 नंतर सत्तेत आलेल्या भाजप सरकारे सदर दोन्ही धोरणे प्रभावीपणे अंमलात आणण्यात अपयशी ठरली असे युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
गोव्यातील खेळाडूंसाठी 4% कोटा राखून ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अलीकडील घोषणेचा संदर्भ देत, विरोधी पक्षनेत्यानी राज्याचे सांस्कृतिक धोरण आणि क्रीडा धोरण प्रभावीपणे राबवीण्याची आणि कलाकार आणि खेळाडूंना त्याचा संपूर्ण लाभ देण्याची मागणी आपल्या पत्रात केली आहे. 37 व्या राष्ट्रीय खेळातील पदक विजेत्यांना सरकारी नोकऱ्या देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि मिस इंडिया डेफ इंटरनॅशनल रनर अप विनिता शिरोडकर यांना नुकत्याच दिलेल्या सरकारी नोकरीच्या आश्वासनाचीही आठवण विरोधी पक्षनेत्याने डॉ. प्रमोद सावंतांना लिहीलेल्या पत्रात केली आहे.
“सांस्कृतिक क्षेत्रात प्रतिभावान विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यासाठी गोवा सांस्कृतिक धोरणातील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी मी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. दुर्दैवाने गेल्या अकरा वर्षांत त्याची अंमलबजावणी करण्यात भाजप सरकारला अपयश आले आहे. मला आशा आहे की सरकार किमान येत्या वर्षापासून दोन्ही धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करेल.”असे युरी आलेमाव यांनी आपल्या पत्रात पूढे म्हटले आहे.
गोव्यातील दूरदर्शी काँग्रेस सरकारने अनुक्रमे 2007 आणि 2009 मध्ये गोवा सांस्कृतिक धोरण आणि गोवा क्रीडा धोरण तयार केले आणि अधिसूचित केले. सर्व संबंधित आणि तज्ञांचे मत घेऊन ही धोरणे तयार करण्यात आली. 2012 पासून लागोपाठची भाजप सरकारे विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स आणि कलाकार आणि खेळाडूंना नोकरीत आरक्षण देण्यात अपयशी ठरले आहेत, असे युरी आलेमाव यांनी पत्रात नमूद केले आहे.
सरकार जानेवारी 2024 पासून कर्मचारी निवड आयोगामार्फत गट क भरती प्रक्रिया सुरू करेल अशी मी आशा बाळगतो असे युरी आलेमाव यांनी पत्रात शेवटी म्हटले आहे.