‘बाहेरील लोकांचे अवैध धंदे बंद करा’
‘रमेश तवडकर यांना फक्घोत ३० टक्के मते मिळाली. मात्र ज्या सत्तर टक्के लोकांनी त्यांना नाकारले त्यांच्यावर आज सुड घेतला जात आहे. त्यांना लक्ष्य केले जात आहे. या सत्तर टक्क्यातील भूमिपुत्रांना वेवसाय करण्या पासून वंचित केले जात आहे. त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. मात्र आम्ही अशा डावपेचांपुढे झुकणार नाही आणि आमदारांच्या सांगण्यावरून जे अधिकारी विरोधातील लोकांवर कारवाई करत आहेत, त्यांच्या हुकूमशाही कार्यपद्धतीच्या विरोधात आम्ही लढू,’’ असे भंडारी म्हणाले.
स्थानिक आमदारावर हल्लाबोल करताना काँग्रेस नेते भंडारी म्हणाले की, सरकारी यंत्रणा वापरून आपल्याला मतदान न केलेल्या लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
“तवडकर आमदार झाल्यापासून त्यांनी आपल्या विरोधात मतदान केलेल्या भूमिपुत्रांच्या व्यवसायावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना त्रास देण्यासाठी ते पोलीस आणि पालिकेचा वापर करत आहे. मासे, भाजीपाला आणि फळे विकणाऱ्या स्थानिक महिला विक्रेत्यांनाही त्यांनी सोडलेले नाही. गरीब लोकांना व्यवसाय चालवण्यापासून वंचित ठेवण्याच्या या कृत्याचा मी निषेध करतो,” असे भंडारी म्हणाले.
भंडारी म्हणाले की, त्यांच्या शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षकांची भेट घेऊन आमदारांच्या इशाऱ्यावर कारवाई न करण्याची विनंती केली होती. “सरकारी अधिकारी दबावाखाली आहेत. त्यांना जे करायचे नाही ते करायला सांगितले जाते आणि या प्रकारामुळे लोकांना त्रास होत आहे,” असे भंडारी पुढे म्हणाले.
“या असंवेदनशील आमदाराला आपल्या गरीब घटक आणि भूमिपुत्रांबद्दल सहानुभूती नाही. आमच्या विश्वसनीय माहितीनुसार, स्थानिक आमदारामार्फत प्रख्यात बाहेरच्या हॉटेल व्यावसायिकांची लॉबी किनारपट्टीच्या पट्ट्यातील भूमिपुत्रांचे धंदे संपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे आणि त्या बदल्यात स्थानिक आमदाराने काणकोण पालिकेच्या मुख्य अधिकारी आणि पोलीस दळाचा वापर करून गरीब भूमिपुत्रांचे व्यवसाय बंद केले आहे,’’ असे ते म्हणाले.
“काणकोणच्या भूमिपुत्रांना इथे व्यवसाय करण्याचा अधिकार नाही काय? काणकोणचा भूमिपुत्र असणे हा गुन्हा आहे का? असे प्रश्न त्यांनी केले.
भंडारी यांच्या म्हणण्यानुसार, रिसॉर्ट्स, कॉटेज, नाईट पार्ट्या, मसाज पार्लर आणि ड्रग्जचा पुरवठा अशा ठिकाणी अनेक बाहेरचे लोक बेकायदेशीरपणे गुंतलेले आहेत, मात्र त्यांच्यावर कारवाई न करता आमदार विरोधकांना टार्गेट करण्यात व्यस्त आहेत.
“गोवा मुक्तीनंतर, काणकोण तालुक्याने विविध राजकीय पक्षांचे आणि विविध जातींचे आमदार पाहिले आहेत, परंतु असा अन्याय, द्वेषाचे, सूडाचे राजकारण कधीच पाहिले नाही. त्यांनी कधीही त्यांच्या विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही, प्रतिस्पर्ध्याला संपवण्याचा कधीही प्रयत्न केला नाही, परंतु नेहमी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांशी योग्य आपुलकीने वागले, प्रतिस्पर्ध्याला जवळ आणण्याचा प्रयत्न केला,” असे भंडारी म्हणाले.
“आमचा ठाम विश्वास आहे की काणकोणकरांचा त्यांच्या भागात व्यवसाय चालवण्याचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि जर त्यांना आणखी त्रास दिला गेला तर आम्ही आमचे आंदोलन अधिक तीव्र करू आणि इथे बेकायदेशिरपणे व्यवसाय करणाऱ्या बाहेरच्या लोकांना व्यवसाय करण्या पासून रोखू,” असा इशारा भंडारी यांनी दिला.