कला अकादमीच्या कामाची निवृत्त न्यायाधीशांखाली चौकशी करा : युरी आलेमाव
पणजी :
कला अकादमीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, कला आणि संस्कृती खात्याचे अधिकारी आणि कलाकार तसेच ध्वनी, प्रकाशयोजना आणि स्थापत्यशास्त्रातील तज्ज्ञांसमवेत केलेल्या पाहणीचा अनुभव भयानक होता. मी सविस्तर अहवाल तयार करत असून तो मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर करुन त्यावर कालबद्ध कारवाई करण्याची मागणी करणार आहे असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.
कला अकादमीच्या दुरुस्ती आणि नूतनीकरण कामाची श्वेतपत्रिका आणि न्यायालयीन चौकशीची माझी मागणी अजूनही कायम असून आगामी विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार आहे. कला अकादमी नष्ट करण्याच्या या गुन्हेगारी कृत्यासाठी कोणालाही माफ केले जाऊ नये, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
पर्वरी येथे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ध्वनी अभियंता रॉजर ड्रेगो, इव्हेंट आयोजक फ्रान्सिस कुएल्हो आणि कलाकार सिसिल रॉड्रिग्स यांच्यासह पत्रकार परिषदेला संबोधित करताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गोव्याचे मौल्यवान वारसा स्मारक नष्ट केल्याबद्दल सार्वजनीक बांधकाम खाते आणि कला आणि संस्कृती विभागावर टीका केली.
मंगळवार 9 जुलै 2024 रोजी पाहणी दरम्यान कला अकादमीच्या प्रत्येक कोपऱ्याची पाहणी करण्यासाठी कलाकारांना तसेच माध्यमांच्या प्रतिनिधीना प्रथमच प्रवेश मिळाला. कला अकादमीची दयनीय अवस्था प्रत्येकाने पाहिली आहे. निकृष्ट आणि हलक्या दर्जाची कामे तज्ञांनी अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिली आहेत.
आज सार्वजनीक बांधकाम खात्याने ध्वनी, प्रकाशयोजना आणि अकॉस्टिकच्या तांत्रिक आराखडे सादर केले. त्यावर रॉजर ड्रेगो आणि फ्रान्सिस कुएल्हो यांनी पुनरावलोकन केले. मी त्यांना सर्व उपकरणांची प्रत्यक्ष तपासणी करण्याची आणि मला अहवाल सादर करण्याची विनंती केली आहे. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर मी हा विषय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मांडणार असल्याचे युरी आलेमाव यांनी सांगितले.
सार्वजनीक बांधकाम विभागाद्वारे सादर केलेल्या आराखड्यांचे पुनरावलोकन केल्यानंतर, असे आढळून आले की ऑर्डर केलेल्या उपकरणांमध्ये आणि पुरवठा करण्यात आलेल्या उपकरणांमध्ये अनेक तफावती आहेत. नवीन खरेदी केलेली अनेक उपकरणे आता कालबाह्य झाली आहेत. या सर्व बाबी काळजीपूर्वक तपासण्याची गरज आहे, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.
मी सांस्कृतिक क्षेत्र आणि कार्यक्रम आयोजनाचा तज्ञ नाही. मला या दीर्घकाळ प्रलंबित समस्येवर तोडगा काढायचा आहे आणि सर्व कलाकारांच्या चेहऱ्यावर हसू पहायचे आहे. मी या मुद्द्याचे राजकारण करणार नाही. त्याचबरोबर जबाबदारी निश्चित करण्यासाठी मी आग्रही राहीन आणि या महाघोटाळ्याला जबाबदार असलेल्या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी करेन, असे युरी आलेमाव यांनी स्पष्ट केले.
तत्पूर्वी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी संजीव सरदेसाई, कार्यकारी अभियंता, पीडब्ल्यूडीचे सहाय्यक अभियंता विनय भोबे, कला आणि संस्कृती खात्याचे उपसंचालक मिलिंद माटे, कला अकादमीचे सदस्य सचिव अरविंद खुटकर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ध्वनी अभियंता रॉजर ड्रेगो, फ्रान्सिस कुएल्हो, इव्हेंट ऑर्गनायझर तसेच सिसील रोड्रीगीस यांच्यासोबत बैठक घेवून विस्तृत चर्चा केली.