
सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण नायक यांचे निधन
गोव्यातील नाट्य चळवळ तसेच सामाजिक कार्याचे भिष्माचार्य अशी ओळख असणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण केशव नायक (९६) यांचे वृद्धापकाळामुळे आज निधन झाले. आज सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर मडगाव येथील मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
दि गोवा हिंदू असोसिएशन, गोमंत विद्या निकेतन, गोवा मराठी विज्ञान परिषद, समाज सेवा संघ, स्नेह मंदिर अशा अनेक संस्थांशी ते संबंधित होते.
सक्रीय समाज कार्यांतून वयोमानामुळे निवृत्त घेतलेल्या रामकृष्णबाब यांनी सध्या बांदोडा-फाेंडा येथील स्नेहमंदिरात आश्रय घेतला होता. मागचा काही काळ त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामूळे त्यांना फोंडा येथील सावईकर इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तिथेच उपचार चालू असताना आज दुपारी पावणे तीनच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
३ नोव्हेंबर १९२८ रोजी रामकृष्ण नायक यांचा जन्म झाला. गोव्यातील समाज कार्यातील अध्वर्यू म्हणून ओळखले जाणारे केशव नायक यांचे ते पुत्र होत. आपल्या वडिलांकडूनच त्यांनी समाजसेवेचा वसा घेतला होता.
आपले संपूर्ण आयुष्य या समाजसेवेला वाहून घेतलेले रामकृष्ण नायक यांनी लग्नही केले नाही. त्यामुळे त्यांचा संबंध ज्या संस्थांकडे आला त्या संस्थांतील कार्यकर्ते हे त्यांचे एकप्रकारे कुटुंबीयच होते. त्यांच्या निधनावर गोमंत विद्या निकेतन संस्थेचे अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर यांनी दुःख व्यक्त केले आहे.
दरम्यान, रामकृष्ण नायक, मडगाव यांच्या निधनाबद्दल विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी शोक व्यक्त केला आहे. गोवा हिंदू असोसिएशन आणि स्नेह मंदिराचे संस्थापक बाब रामकृष्ण नायक यांच्या निधनाने दु:ख झाले. समाजकार्य ही त्यांची जीवनशैली होती. ते स्वतः एक संस्था होते. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. असे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.