‘दिव्यांग मुलांसाठी वार्षिक १०० रुपयांत शाळेसाठी जमीन’
पणजी:
गोवा राज्य मंत्रीमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. या निर्णयांची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Goa CM Dr. Pramod Sawant) यांनी दिली. यात दिव्यांग मुलांसाठी वार्षिक 100 रूपयांत शाळा उभारण्यासाठी जमिन देण्यासह, 4G टॉवरसाठी जमिन हस्तांतरणाबाबतही निर्णय झाले आहेत.
आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत झालेले महत्वाचे निर्णय :
1) विशेष विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी दिली जमिन
विशेष विद्यार्थ्यांसाठी शाळा चालविणाऱ्या आत्मविश्वास सोसायटीला 3410 चौरस मीटर जागा 40 वर्षांसाठी लीजवर देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे.
या जागेवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शाळा उभारली जाणार असून या शाळेत वार्षिक फी केवळ 100 रूपये असणार आहे.
जानेवारी 2014 पासून थकीत असलेले 40 लाखाहून अधिक भाडे माफ करण्याचाही निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे.
2) माझी बस योजना
‘माझी बस’ योजनेला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेत कदंबा महामंडळ खासगी बसेस भाड्याने घेऊन चालवणार आहे. काणकोण-पणजी, सावर्डे-पणजी, कुडचडे-पणजी आणि पेडणे-पणजी अशा 4 मार्गांवर या बसेस धावतील.
3) राज्यातील 8 गावांमध्ये 4G टॉवरसाठी जमिनीचे हस्तांतरण
सरकारने उत्तर गोव्यातील 5 तर दक्षिण गोव्यातील 3 गावांमध्ये मोबाईल फोनच्या 4G सेवा पुरविण्याच्या उद्देशाने टॉवर उभारण्यासाठी सरकारी जमिनीच्या हस्तांतरणास मंजुरी दिली आहे.
4) लॉजिस्टिक्स आणि वेयरहाऊसिंग पॉलिसीला मान्यता
याशिवाय मंत्रीमंडळाने आजच्या बैठकीत गोवा लॉजिस्टिक्स आणि वेयरहाऊसिंग पॉलिसी 2023 ला देखील मान्यता दिली आहे.