‘यांच्या’ पुढच्या पिढ्यांना निसर्गाच्या शापाचा सामना करावा लागेल : अमरनाथ पणजीकर
पणजी :
भाजप सरकारचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर मंत्र्यांनी संपत्तीच्या लोभापोटी गोव्याचा नाश केल्याने निसर्गाच्या शापांना त्यांच्या पुढच्या पिढ्यांना सामोरे जावे लागेल याची जाणीव ठेवावी. किमान आता तरी जागे व्हा. गोवा वाचवा असा इशारा काँग्रेस माध्यम विभाग प्रमूख अमरनाथ पणजीकर यांनी दिला आहे.
सोमवारी गोवा विधानसभेत विचारार्थ आणि पारित करण्यासाठी येणाऱ्या गोवा गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा (दुरुस्ती) विधेयक 2024 वर प्रतिक्रिया देताना, अमरनाथ पणजीकर यांनी भाजपने गोव्याचा नाश केला असा गंभीर आरोप केला.
भाजपचे विद्यमान मुख्यमंत्री, मंत्री आणि पक्षाचे पदाधिकारी यांनी त्त्यांच्या भूतकाळातील नेत्यांनी सत्तेत असताना घेतलेल्या गोवा विरोधी आणि गरीब विरोधी धोरणांमूळे नंतर ज्या यातना भोगल्या त्याचा धडा घ्यावा. भाजप नेतृत्व त्यातून धडा घेत नाहीत हे सर्वात दुर्दैवी आहे. सर्व दुष्कर्मांची परतफेड इथेच करावी लागते, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.
गोव्यात भ्रष्टाचाराने नवा उच्चांक गाठला असून सर्वसामान्यांना प्रत्येक स्तरावर त्रास सहन करावा लागत आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या जमीन रुपांतरणामूळे निसर्गाने आपला रोष दाखवायला सुरुवात केली आहे. संपत्तीच्या लालसेपोटी गोव्याचा नाश करणाऱ्यांना निसर्ग कदापी माफ करणार नाही, असा इशारा अमरनाथ पणजीकर यांनी दिला.
मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी, भाजप आमदार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना उशीर होण्याआधी जागे व्हा आणि सुधारात्मक उपाययोजना करा, असे आवाहन करतो. अती लोभ शेवटी आपत्तीकडेच वळतो असे अमरनाथ पणजीकर यांनी स्पष्ट केले.