google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘पंतप्रधान आता तरी गोमंतकीयांची सुटका करतील का?’

मडगाव :

गोव्यातील मेरशी येथे जनसभेला संबोधित करताना तत्कालीन पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी उघड केलेले ‘विशेष दर्जाचे’ भूत गोव्याच्या मानगुटीवर बसले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीनी आता तरी गोमंतकीयांची त्याच्याकडून सुटका करावी असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.



पंतप्रधानांच्या गोवा दौऱ्याच्या एक दिवस आधी २०१४ मध्ये मेरशी येथिल सभेतील नरेंद्र मोदींच्या भाषणाचा व्हिडिओ प्रसिद्ध करून, युरी आलेमाव यांनी गोव्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांचे लक्ष वेधून, सदर विषयांवर बोलण्याचे त्यांना आवाहन केले आहे.

भाजप सरकारच्या भांडवलशाही धोरणामुळे गोव्याच्या अस्मितेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पर्यावरण विरोधी, शेतकरी विरोधी धोरणांमुळे गोव्याचे पर्यावरण, वन आणि वन्यजीव धोक्यात आले आहेत, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.



खुद्द पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील नीती आयोगाने जारी केलेल्या अहवालात गोव्यातील बेरोजगारीचा दर उघड झाला आहे. भाजप सरकार रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबाबत अनभिज्ञ आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोविडच्या शेकडो रुग्णांच्या मृत्यूंबद्दल पंतप्रधानानी बोलणे गरजेचे आहे. मोपा विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर दाबोळी विमानतळाचे काय होणार यावर प्रधानमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे. गेल्या दहा वर्षांपासून गोव्यातील खाणकाम बंद असल्याची आठवण करून युरी आलेमाव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना करून दिली आहे.



शेतकऱ्यांच्या लागवडीयोग्य सुपीक जमिनींवर लादण्यात येत असलेल्या प्रस्तावित आयआयटी प्रकल्पावर पंतप्रधानांनी बोलणे आवश्यक आहे. पश्चिम घाटातील जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणावर नाश करणार्‍या तीन रेषीय प्रकल्पांवर बोलण्याची मी पंतप्रधानांना विनंती करतो. आमची जीवनदायीनी आई म्हादईचे पाणी वळवीण्याच्या कर्नाटक राज्याच्या प्रयत्नांवर पंतप्रधानांना बोलू द्या, असे युरी आलेमाव यांनी आवाहन केले आहे.

गोव्यावर मोठा आर्थिक बोजा आहे. भाजप सरकारने गोव्याला दिवाळखोरीत ढकलले आहे. २०१२ मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजप सरकारला गोवा लोकायुक्तांकडून भ्रष्टाचाराची २१ प्रमाणपत्रे मिळाली. मला आशा आहे की पंतप्रधान यावरही बोलतील, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.


गोव्याला ‘कोळसा हब’ आणि ‘कॅसिनो कॅपिटल’ करण्याबाबत पंतप्रधानांनी त्यांच्या सरकारची स्पष्ट भूमिका मांडणे आवश्यक आहे. गोव्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अन्नधान्याची प्रचंड नासाडी आणि चोरीची पंतप्रधानांनी दखल घ्यावी, असे विरोधी पक्षनेत्यांनी म्हटले आहे.

सामूहिक पक्षांतराना उत्तेजन देणाऱ्या भाजपशासीत अनेक राज्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. जनादेशाचा अपमान व लोकशाहीचा खून रोखण्यासाठी कडक पक्षांतर विरोधी कायदा आणण्यासंबंधी प्रधानमंत्री काही घोषणा करतील का? असा सवाल युरी आलेमाव यांनी विचारला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!