गोव्याचे क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी नुकतीच ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. गोव्यात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबाबत ही भेट घेण्यात आली आहे.
या स्पर्धेच्या थीम साँगसाठी बिग बी अमिताभ बच्चन आवाज देणार आहेत. त्यांनी यासाठी संमती दर्शवली आहे, अशी माहिती मंत्री गोविंद गावडे यांनी सोशल मीडिया पोस्टमधून दिली आहे. त्यांची ऋजुता, एक कलावंत म्हणून त्यांनी केलेले आदरातिथ्याने भारावलो आहे. त्यांची हीच वृत्ती त्यांना उत्तम अभिनेता बनवते, असे गावडे यांनी म्हटले आहे.
गोव्यात 25 ऑक्टोबरला या स्पर्धेचे उद्घाटन होईल. ही स्पर्धा 16 दिवस चालणार आहे. 9 नोव्हेंबर रोजी स्पर्धेचा समारोप होईल. स्पर्धेच्या उद्घाटनाविषयी पंतप्रधान कार्यालयाने एक निश्चित तारीख पाठविण्यास सांगितली होती.
त्यानुसार 25 ऑक्टोबर ही तारीख कळवली आहे. स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊ शकते. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हाचे 14 मे रोजी, तर शुभंकर ‘मोगा’चे 18 जून रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये अनावरण झाले.