‘व्हडलें घर’ आता इंग्रजी, कन्नड, तेलुगूतही…
पणजी :
कोंकणी भाषेचे अग्रणी आणि साहित्य अकादेमी पुरस्कार विजेते प्रसिध्द जेष्ठ लेखक उदय भ्रेंबे यांची ‘व्हडलें घर’ ही गोव्यातील पोर्तुगीजांच्या काळातील इतिहासाची दुसरी बाजू दाखवणारी गाजलेली कादंबरी आता जागतिक वाचकांसाठी उपलब्ध होत आहे. या कादंबरीच्या इंग्रजी, कन्नड, तेलुगू भाषेतील अनुवादाचे प्रकाशन 6 जानेवारी रोजी रविंद्र भवन, मडगाव येथे संध्याकाळी 5 वाजता होणार आहे.
‘कर्णपर्व’ या कोंकणी नाटकासाठी साहित्य अकादेमीचा पुरस्कार मिळवलेल्या उदय भेंब्रे यांनी गोव्याच्या इतिहासातील महत्वाची बाजू ‘व्हडलें घर’ या कादंबरीतून कोंकणी जगतासमोर गेल्यावर्षी आणली. वाचकांनी या कादंबरीला भरभरून प्रतिसाद दिला आणि त्याचप्रमाणे ही कलाकृती इतर भाषांत अनुवादित करण्याची मागणीही केली होती. कादंबरीच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडलेले हे सत्य गोव्याबाहेरील वाचकांनाही अनुभवता यावे, यासाठी ‘फेथ ऑन फायर (इंग्रजी अनुवाद विद्या पै), दोडामने (कन्नड अनुवाद एस. एम. कृष्णा राव), यातनागृहम (तेलुगू अनुवाद रंगनाथ राव) या नावाने ‘व्हडलें घर’ 6 रोजी प्रकाशित होत आहे.
यावेळी ‘जग जोडताना : प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करताना घ्यायची काळजी’ या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गीता शेणॉय, मेल्विन रॉड्रीगिज, जोस लॉरोन्सो, अकल्पिता राऊत देसाई आणि उदय भेंब्रे आदी मान्यवर आपले मत मांडतील. अन्वेषा सिंगबाळ या परिसंवादाचे समन्वयन करतील. तरी, सदर कार्यक्रमाला वाचकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक, अभिनव क्रिएशन, संजना पब्लिकेशन, क्युरेट बुक्स यांच्यावतीने करण्यात आले आहे.