
रेबीज (rabies) हा एक अत्यंत घातक आणि झुनोटिक आजार आहे. रेबीजवर अद्याप कोणताही उपचार उपलब्ध नाही. रेबीज झालेल्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर मानवांमध्ये रेबीजचा संसर्ग होऊ शकतो. जगभरात, या आजारामुळे दरवर्षी सुमारे 59 हजार लोकांचा मृत्यू होतो, त्यापैकी एक तृतीयांश मृत्यू भारतात होतात. असे असले तरी गोव्याने याबाबत योग्य नियोजन करून राज्यातून रेबीजला हद्दपार करण्यात यश मिळवले आहे. गोवा रेबीज (rabies) हद्दपार करणारे पहिले राज्य ठरले असून, 2018 पासून राज्यात एकही रूग्णाची नोंद झालेली नाही.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ऑक्टोबर 2021 मध्ये घोषित केलेल्या जागतिक उद्दिष्टाच्या अनुषंगाने, भारताने 2030 पर्यंत रेबीजमुळे होणारे मृत्यू पूर्णपणे नष्ट करण्यासाठी एक राष्ट्रीय कृती योजना तयार केली आहे. ही योजना रोगाच्या नियंत्रणासाठी “एक आरोग्य” या दृष्टिकोनावर भर देते.
रेबीज विषयक तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे 70 टक्के श्वानांचे लसीकरण केल्यास त्यांच्यात हर्ड इम्युनिटी येऊ शकते. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होण्यास आळा बसू शकतो. पण, भारतासारख्या मोठ्या देशात 70 टक्के लसीकरणासाठी मोठी योजना आखावी लागेल.
दरम्यान, गोव्याने केलेल्या उपाययोजना पाहता राज्याने या रोगाला हद्दपार करण्यात यश मिळवले आहे. स्वयंसेवी संस्थांनी यासाठी 2014 पासून पुढाकार घेतला पुढे या प्रयत्नांना राज्य सरकार आणि त्यानंतर जागतिक पातळीवर देखील सहकार्य मिळाले.