‘केंद्रीय अर्थसंकल्पात गोव्यासाठी काहीच नाही’
union budget 2023 :
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर तीव्र शब्दात टीका करत गोवा प्रदेश कांग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना गोवा व गोमंतकीयांचा पूर्णपणे विसर पडलेला असून गोव्यासाठी त्यांनी या अर्थसंकल्पात निधीची कोणतीही तरतूद केलेली नाही.
गोव्याच्या पर्यटन व खाण उद्दोगाची स्थिती नाजूक व भयावह अशी असतानाही या दोन्ही उद्दोगांकडे अर्थसंकल्पात सीतारामण यानी दुर्लक्षच केले असल्याचा आरोप चोडणकर यांनी केला. तसेच दशकातून एकदा होणा-या संत फ्रान्सिस झेव्हियर यांच्या शव प्रदर्शनाचाही त्यांना विसर पडला असल्याचे चोडणकर यांनी नजरेत आणून दिले. केंद्र सरकारसाठी आम्ही थर्ड क्लास वर्गातील नागरिकही नाही आहोत हे या अंदाजपत्रकामुळे स्पष्ट होत असल्याची टिप्पणीही चोडणकर यांनी केली.
खाणबंदीमुळे फटका बसलेल्या व महामारीमुळे संकटात सापडलेल्या गोव्याच्या अर्थसंकल्पाला चालना देण्यासाठी केद्राने या अर्थसंकल्पातून कोणतीही तरतूद केली नसल्याचेही चोडणकर यानी म्हटले आहे. केंद्र सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत कमी झाली असल्याने गोवा सरकार येथील विजेचे दर व पाणीपट्टी वाढवून जनतेवर बोजा टाकू लागले असल्याचे चोडणकर यानी म्हटले आहे.
जागतिक दर्जाचे वारसा स्थळ असलेल्या जुने गोव्याला केंद्राकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्याने गोव्यातील सांस्कृतिक व वारसा क्षेत्रात निराशेचे वातावरण पसरले आहे याकडेही चोडणकर यानी लक्ष वेधले आहे.
संत फ्रान्सिस झेव्हियर यांच्या शव प्रदर्शनाचा सोहळा असताना केंद्र सरकारला गोव्याला वारसा संवर्धन व शव प्रदर्शन सोहळ्यासाठी निधी देण्यास विसर पडावा या गोष्टीमुळे राज्यातील धर्मनिरपेक्ष जनता दुखावली गेलेली असून सरकारकडून आपणाला अपमानास्पद वागणूक मिळू लागला असल्याचे त्यांना वाटू लागले आहे.यातून केंद्र सरकार करीत असलेला भेदभाव दिसून येत असल्याचे चोडणकर यानी म्हटले आहे. राज्यातील फार्मास्यूटिकल्स उद्दोगालाही केंद्राकडून मदतीची अपेक्षा होती असाही चोडणकर यानी स्पष्ट केले आहे.