एल्विसची पाऊले चालली कुणीकडे?
आप झाले, काँग्रेस झाले, आता भाजप का?
(विशेष प्रतिनिधी) :
लोकसभा निवडणूक बैठकीसाठी बोलावण्यात न आल्याने काँग्रेस नेते एल्विस गोम्स यांनी नुकतीच पक्षनेतृत्वावर तोंडसुख घेत आपल्या मनातील खदखदीला वाट करून दिली. यातून एल्विसने प्रदेश काँग्रेसवरच्या नाराजीवरही शिक्कमोर्तब केले आहे, त्यामुळे ते लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच पक्षाला सोडचिट्टी देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, निवडणूक लढवण्यासाठी आपल्या प्रशासकीय नोकरीचा राजीनामा देऊन, आम आदमी पक्षाचे गोवा समन्वयकपद स्वीकारले होते. मधल्या काळात आपला सोडचिठ्ठी देत कॉंग्रेस प्रवेश केलेल्या एल्विस यांची पाऊले या नाराजीनाट्यानंतर आता आता भाजपकडे चालली असावीत, असा अंदाज व्यक्त होत आहे.
दरम्यान, मागील आठवड्यात ओनएनजीसीत झालेल्या कार्यक्रमानंतर कुंकळ्ळीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, स्थानिक नगरसेवक विदेश देसाई व एल्विस गोम्स यांच्यात विशेष बैठक झाल्याचे कळते. सदर बैठकीत पुढील विधानसभेची कुंकळ्ळीची उमेदवारी गोम्स यांना देण्यावर खल झाल्याचेही सुत्रांकडून समजते आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर डोळा ठेवून असलेल्या गोम्स यांना दक्षिण गोव्याची उमेदवारी गिरीश चोडणकरांना मिळणार याची कुणकूण लागल्याने त्यांनी भाजपशी जवळीक साधल्याचे समजते.
कॉंग्रेसच्या छाननी समितीच्या भेटीवेळी आपल्याला बोलविले नाही असा आरोप जरी एल्विस गोम्स यांनी केला तरी सदर बैठकीत इच्छुक उमेदवारांना नव्हे तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यानांच बोलविले होते असेही सुत्रांकडून कळते आहे.
कॉंग्रेस पक्षाने हायकंमाडच्या सल्ल्यावरुन इच्छुक उमेदवारांचे अर्ज 5 फेब्रुवारी पर्यंत मागविले असून नेमके त्याच्या दुसऱ्याच दिवशी एल्विस गोम्स यांनी पक्षावर जाहिर आरोप केले आहेत.
दरम्यान, माजी आयएएस अधिकारी असलेल्या एल्विस गोम्स यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देवून आम आदमी पक्षातर्फे 2017 मध्ये कुंकळ्ळीची विधानसभा व त्यानंतर 2019 मध्ये दक्षिण गोव्यातून लोकसभा निवडणुक लढविली होती. परंतू दोन्ही वेळा ते आपली अनामत रक्कमही वाचवू शकले नव्हते. त्यांनतर 2022 मध्ये पणजी मतदारसंघातून कॉंग्रेसच्या उमेदवारीवरही त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
दरम्यान, कॉंग्रेस पक्षाच्या स्थानिक नेतृत्वासमोर वेगवेगळ्या अडचणी उभ्या करुन आपले इस्पित साद्य करण्याचा प्रयत्न दक्षिण गोव्यातील एक राजकीय नेता करीत असून, भाजप व कॉंग्रेस अशा दोन्ही होड्यांवर पाय ठेवून असलेल्या सदर राजकारण्याच्या कारनाम्यांचा सुगावा लागल्याने कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षानेही त्यांच्यापासून चार हाताचे अंतर राखल्याचे दिसते आहे.