‘ध्वनीक्षेपकांच्या वापरावरील बंदीतून द्यावा स्थानिकांना दिलासा’
मडगाव :
गेल्या १० वर्षात भाजप सरकारने गोव्याची ओळखच नष्ट केली आहे. इव्हेंट मॅनेजमेंट आणि व्यावसायिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या धोरणांने आमचे पारंपारीक उत्सव, कला व संस्कृतीकडेल दुर्लक्ष झाले आहे. सरकारी अधिकारी आमच्या स्थानिक पारंपारिक आयोजकांना त्रास देतात परंतु रेव्ह पार्ट्यांसाठी परदेशी नागरीकांना पूर्ण स्वातंत्र्य मिळते असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.
गोव्यातील पारंपारीक सण व उत्सवांत आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व स्थानिक पारंपारिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना ध्वनीक्षेपकांच्या वापरावर लादण्यात आलेल्या बंदीतुन तातडीने दिलासा द्यावा, अशी माझी मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी आहे असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
गोव्यात परदेशी लोकांच्या कार्यक्रमांचे रेड कार्पेटने स्वागत केले जाते, परंतु पारंपारिक नाताळ आणि नवीन वर्षाच्या नृत्य रजनीनी सरकारच्या निर्बंधांचा सामना करावा लागतो. मला आशा आहे की सरकारला सुबूद्धी येईल आणि स्थानिक कार्यक्रमांना होणारा त्रास थांबेल असे युरी आलेमाव म्हणाले.
सरकारने ताबडतोब ध्वनीक्षेपक वापर निर्बंधावर शिथिलतेसाठी अधिसूचना जारी करावी जेणेकरुन स्थानिक आयोजकांना तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि त्यांच्या हितचींतकांना आणि वार्षिक सहभागींना आगाऊ माहिती देणे सुलभ होईल असे युरी आलेमाव म्हणाले.
गोव्याने आपली मूळ ओळख आधीच गमावली आहे. आपल्या परंपरा, संस्कृती आणि वारसा जपण्यासाठी सरकारने आतातरी जागे झाले पाहिजे. पर्यटन विभागाने जेट्टी धोरणाचे काम थांबवून गोव्याच्या सांस्कृतिक पर्यटनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे युरी आलेमाव म्हणाले.