
मुख्यमंत्र्यांवर काँग्रेसची बोचरी टिका
पणजी :
रामराज्य रामायण काळात अस्तित्वात होते, लस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्हे तर शास्त्रज्ञांनी बनवल्या आहेत आणि जम्मू आणि काश्मीर १९४७ पासून भारताचा अविभाज्य भाग आहे. शाखेत तयार झालेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवतांनी केवळ पौराणिक कथाच नाही तर विज्ञान आणि इतिहासाचे धडेही घेणे गरजेचे आहे, अशी बोचरी टिका काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.
श्रीराम दिग्विजय रथयात्रेच्या आगमनावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हापसा येथे केलेल्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या अर्धवट ज्ञानावर आणि खोटारडेपणा पसरवण्याच्या प्रयत्नांवर सडकून टीका केली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ‘रामराज्य’ २०१४ मध्येच सुरू झाले असे वाटत असेल तर रामायण काळात काय चालले होते? असा सवाल अमित पाटकर यांनी केला. प्रमोद सावंत यांनी एकप्रकारे भगवान श्रीरामांचा अपमान केला आहे, असे ते म्हणाले.
कोविड लस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनवल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा ऐकून घृणा वाटते. पोलिओ लसींचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांना त्या लसी बनवण्यासाठी वीस वर्षे लागली, असे सांगून त्यांनी त्यांचा अपमान केला आहे. डॉ. प्रमोद सावंत यांनी हे जाणून घेतले पाहिजे की लस तयार करण्यासाठी वैज्ञानिक प्रक्रिया पाळावी लागते. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी १९५२ मध्ये राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेची स्थापना केली ज्याने कोविड चाचणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, याची आठवण अमित पाटकर यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली.
१९४६ पासून जम्मू आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता आणि आहे. भाजप सरकारने कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करून राज्याची अधोगती केली आहे, असे अमित पाटकर म्हणाले.
२०१५ मध्ये रामराज्य सुरू झाल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत करत असतील तर ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळ अपयशी ठरला हे मान्य करत आहेत का? असा सवाल अमित पाटकर यांनी केला. मोदी-शहा नियंत्रित भाजपचे लाऊडस्पीकर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा ह्या जुमलेबाजांचा उदोउदो करण्याच्या प्रयत्नात भाजपच्याच संस्थापक नेत्यांची अवहेलना करत आहेत हे दुःखद आहे. भाजपमध्ये अन्य कोणत्याही नेत्याला महत्त्व नाही, असे अमित पाटकर म्हणाले.