पणजी :
काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे सनबर्न फेस्टिव्हलच्या अधिकृत समाजमाध्यम हेंडलवरुन गोव्यातील सनबर्न महोत्सवाच्या तिकीट विक्रीची घोषणा केल्याप्रकरणी लक्ष वेधून सदर तिकीटांच्या विक्रीवरील जीएसटी घटकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले व केंद्रिय अर्थमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सनबर्न फेस्टिव्हलच्या अधिकृत समाज माध्यमावर “सिक्रेट प्री-सेल लिंक” च्या केलेल्या उल्लेखाची दखल घ्यावी. गोव्यात सनबर्न फेस्टिव्हलला कोणतीही परवानगी दिलेली नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्टपणे सांगितले असल्याने परवानगीशिवाय तिकिटांची विक्री कशी सुरू झाली? तिकिटावरील जीएसटी घटकाचे काय? तुम्ही कारवाई करणार की गप्प बसणार?, असा सवाल अमित पाटकर यांनी अर्थमंत्र्यांना केला आहे.
सदर तिकिटांच्या बेकायदेशीर विक्री विरोधात नागरिकांनी तक्रार नोंदवावी असे बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांचा मी निषेध करतो. सरकार स्वेच्छा दखल घेऊन कारवाई का करू शकत नाही? असा सवाल अमित पाटकर यांनी केला.
या सनबर्न फेस्टिव्हलमुळे सर्व कॅबिनेट मंत्री, भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मलई मिळत असल्याने भाजप सरकार हे सर्व होऊ देत आहे. हा महोत्सव त्यांच्यासाठी वार्षिक “मनी मेकिंग इव्हेंट” बनला आहे, असा आरोप अमित पाटकर यांनी केला.
सनबर्नचे प्रवर्तक मोदी-शहा यांच्या क्रोनी क्लबचे सदस्य असल्यानेच भाजप सरकारचे सनबर्नला अभय आहे. दक्षिण गोव्यात सनबर्नला विरोध करणारे ठराव पारित केलेल्या गोव्यातील पंचायतींचे मी आभार मानतो. मी उत्तर गोव्यातील जनतेलाही या सनबर्न महोत्सवाला विरोध करण्याचे आवाहन करतो. आपल्या मुलांच्या भविष्याचे रक्षण करण्यासाठी आपण एकजुटीने उभे राहू या, असे अमित पाटकर म्हणाले.
मी अर्थमंत्र्यांच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे. जर त्या कारवाई करण्यात अयशस्वी ठरल्या, तर हे निश्चित होईल की डबल इंजिन सरकार या घोटाळ्याचा भाग आहे, असे अमित पाटकर म्हणाले.