‘…मगच शोधावा माविन गुदिन्हो यांनी तिसरा विमानतळ’
मडगाव :
गेल्या विधानसभा अधिवेशनात मी घोस्ट (भूत) एअरपोर्टबाबत बोललो होतो. मोपा विमानतळावरून अजून एकही विमान उडालेले नसताना, वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो हे गोव्यातील तिसऱ्या विमानतळाच्या शोधात आहेत. गोव्याच्या रस्त्यांवर आधीच अवतरलेल्या जीवघेण्या भूताला मारल्यानंतरच त्यांनी तिसऱ्या विमानतळाचा शोध घ्यावा असा सणसणीत टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी लगावला आहे.
गोव्यात दररोज जीवघेण्या अपघातात निष्पाप लोकांचा जीव जात आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था, रस्ते वाहतूक विभागातील भ्रष्टाचार हे या अपघातांचे प्रमुख कारण आहे. रस्त्यांची देखभाल करणे आणि वाहनांची योग्यता तपासणे यावर कोणाचेच नियंत्रण नाही, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.
वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी गोव्याच्या रस्त्यांवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. जीवघेणे अपघात थांबावेत यासाठी त्यांनी पावले उचलण्याची गरज आहे. भाजप सरकारच्या दुर्लक्षामुळे आणि उदासीनतेमुळे आज अनेक कुटुंबे उध्वस्त होत आहेत, असे युरी आलेमाव म्हणाले.
गोव्यातील रस्ते पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सरकारने सक्रिय पावले उचलली पाहिजेत. पत्रादेवी ते म्हापसा आणि वेर्णा महामार्ग तसेच मोलें-फोंडा रस्ता आता “किलर झोन”मध्ये बदलला आहे. वाहनांच्या हालचालींवर रस्ते वाहतूक विभागाचे कोणतेही नियंत्रण नाही, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.
पर्यटकांची संख्या अनेक पटींनी वाढणार असल्याने तिसऱ्या विमानतळाची गरज असल्याचा साक्षात्कार झालेले वाहतूक मंत्री मंत्री मॉविन गुदिन्हो आता वादग्रस्त “जेटी धोरणाच्या” धर्तीवर “विमानतळ धोरण” आणण्यास पर्यटन मंत्र्यांस सांगणार नाहीत अशी आशा बाळगूया, असा टोमणा युरी आलेमाव यांनी मारला.