#Boycott Maldives : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी तिथल्या सुंदर बेटांवर भ्रमंती केली. मोदी यांनी त्यांच्या लक्षद्वीप भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंना लोकांकडून पसंती मिळत आहे. परंतु, मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर मालदीवमधील काही नेत्यांचा तीळपापड झाला आहे. मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अपमानास्पद टीका केली आहे, तर काही मंत्र्यांनी भारतीय संस्कृतीला लक्ष्य केलं आहे, भारतीयांवर वर्णद्वेषी टीप्पण्या केल्या आहेत. त्यामुळे भारतात एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर ‘#Boycott Maldives’ असा हॅशटॅग ट्रेंड होतं.
दरम्यान, सतत मालदीववारी करणाऱ्या बॉलिवूड कलावंतांनीदेखील मालदीवमधील मंत्र्यांच्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने एक्सवर एक पोस्ट करून त्याचा संताप व्यक्त केला आहे. अक्षयने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मालदीवमधील नेत्यांनी भारतीयांबद्दल चिथावणीखोर आणि वर्णद्वेषी वक्तव्ये केली आहेत. जो देश तुमच्या देशात सर्वाधिक पर्यटक पाठवतो, त्या देशाबद्दलच तुमचे नेते अशी वक्तव्ये करत आहेत हे पाहून आश्चर्य वाटलं. आम्ही आमच्या शेजाऱ्यांबरोबर चांगले आहोत, परंतु, आम्ही असा द्वेष का सहन करायचा? मी अनेकवेळा मालदीवला भेट दिली आहे आणि या देशाची नेहमीच प्रशंसा केली आहे. परंतु, आता सन्मान महत्त्वाचा आहे. चला आपण आपल्या देशातील समुद्रकिनाऱे पाहुया आणि आपण आपल्या देशाचं पर्यटन वाढवू.
दुसऱ्या बाजूला, भारत सरकारनेही मालदीवमधील मंत्र्यांच्या वक्तव्यांचा निषेध नोंदवला आहे. मालदीवमधील मोहम्मद मुइज्जू यांच्या सरकारमधील मंत्री मरियम शिउना, मालशा शरीफ आणि महजून माजिद यांनी सोशल मीडियावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त टिप्पणी केली होती. भारत सरकारने हा मुद्दा मोहम्मद मुइज्जू सरकारसमोर उपस्थित केला. मालदीवमधील भारताच्या उच्चायुक्तांनीदेखील या वक्तव्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मालदीव सरकारने अधिकृत निवेदन जारी केलं. त्यामध्ये मालदीव सरकारने म्हटलं आहे की, आमच्या मंत्र्यांनी केलेली व्यक्तव्ये ही त्यांची वैयक्तिक आहेत. मालदीव सरकारचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.