
शुक्रवारी पुण्यात येणार “लोक – शास्त्र सावित्री”
पुणे :
थिएटर ऑफ रेलेवन्सचे शुभचिंतक आणि प्रयोगकर्ते समता, बंधुता आणि शांततेचा संकल्प करीत ‘ महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाचा कणा व वैचारिक प्रगतीशीलतेचा’ वारसा जगणारे, रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित दिग्दर्शित नाटक “लोक-शास्त्र सावित्री” 29 एप्रिल 2022, शुक्रवार रोजी, संध्याकाळी 5.30 वाजता, बालगंधर्व रंगमंदिर पुणे, येथे प्रस्तुत करणार आहेत.
अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, सुरेखा साळुंखे, प्रियंका कांबळे, तुषार म्हस्के, स्वाती वाघ, नृपाली जोशी, संध्या बाविस्कर, आरोही बाविस्कर, तनिष्का लोंढे आणि अन्य कलाकार यांनी यात सहभाग घेतला आहे.
रंगभूमी ही समता, बंधुता आणि शांतीची पुरस्कर्ती असावी, परंतु असे होत नाही. रंगभूमी ही केवळ सत्तेच्या वर्चस्वाचे माध्यम बनली आहे आणि रंगकर्मीं त्यांचे कठपुतली बनले आहेत जे रंगभूमीच्या मूळ उदग्माच्या विरोधात आहे. रंगकर्माचे मूळ आहे मनुष्याला आणि मनुष्यतेला विकारांपासून मुक्त करणे. मनुष्याच्या विचाराला विवेकाच्या ज्योतीने प्रज्वलित करणे. रंगकर्म समग्र आहे, रंगकर्म मानवतेचे पुरस्कर्ते आहे. रंगकर्माची प्रक्रिया आगीत स्वतःला जाळून ‘स्व’ ला जिवंत ठेवण्याची आहे.
रंग म्हणजे विचार आणि विचारांचे कर्म म्हणजेच “रंगकर्म” ! कला ती जी माणसात माणुसकी जागवते. जाणिवांच्या ओल्या मातीत विचारांचे बीज रोवून जीवनाची नवीन दृष्टी सृजित करते. आपल्या अमूर्त सृजन स्पंदनांनी मूर्त कलाकाराला आकार देते. असे कलाकार आपल्या रंगसाधनेतून साध्य झालेल्या कलासत्वाला नाट्य प्रस्तुतीच्या माध्यमाने सादर करत प्रेक्षकांमध्ये माणुसकीला स्पंदीत करतात.
स्वतःच्या अस्तित्वाचा शोध सावित्रीबाई फुले आणि बहिणाबाईंनी घेतला होता. सावित्री बाईंनी पितृसत्ता, सामंतवाद, जातीवाद यांच्या वर्चस्ववादाला आव्हान दिले होते. त्यांनी अज्ञानाच्या फेऱ्यातून अखंड समाजाला बाहेर काढले. वर्षानुवर्षे चालत आलेल्या अनिष्ठ रुढींच्या गुलामीतून बाहेर पडण्यासाठी समाजाला प्रेरित केले. आधुनिकतेचा बदल विचारांनी स्वीकारला. त्यांनी संघर्षाची मशाल हाती घेतली परंतु त्याची धग जनमानसाच्या मनात अजूनही धगधगते का ?
जनमानसात सावित्रीबाई फुलेंची ओळख आहे, त्यांचे नाव आहे परंतु त्यांचे तत्व रुजले नाही, आणि हे तत्व रुजवण्याची प्रक्रिया “लोक- शास्त्र सावित्री” हे नाटक करते. सावित्री म्हणजे विचार !प्रत्येक व्यक्तीच्या मनात सावित्री जागी होते पण ती व्यवहाराच्या प्रहराने ती लोप पावते. प्रत्येकाच्या मनातील सावित्रीला चिन्हीत करण्यासाठी हे नाटक पुढाकार घेते.
1831 पासून आतापर्यंतच्या काळाचा आलेख घेतला तर लक्षात येईल, त्या काळापासून सुरू झालेले सांस्कृतिक प्रबोधन जागतिकीकरणाने संपवले आहे. सावित्रीच्या प्रतिरोधाला प्रचारकी व्यक्तिवादाचे स्वरूप देऊन अलगदपणे सर्वसामान्य केले.सावित्रीचा जो प्रतिरोध होता त्याची ताकद संपवली.आता हा प्रतिरोधाचा न्याय पताका घेऊन, “थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत” “लोक- शास्त्र सावित्री” या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा सावित्रीच्या महत्वाला, तिच्या विचाराला जनमानसात जागवत आहे.

आज जग युद्धात आहे अशा प्रलयकाळात सांस्कृतिक सृजनकारच या जगाला वाचवू शकतील, जेव्हा संपूर्ण राजनैतिक व्यवस्था विकली गेलेली आहे. सत्य-असत्याच्या पुढे जाऊन आणि निरंतर खोटे पसरवून समाजाच्या मानसिकतेवर कब्जा करणाऱ्या विकारांपासून आज केवळ सांस्कृतिक सृजनकार मुक्ती देऊ शकतात. परिवर्तनाच्या वाटेवर सांस्कृतिक सृजनकार मनुष्याला हिंसेपासून अहिंसेकडे, आत्महीनतेपासून आत्मबळाकडे, विकारांपासून विचारांकडे, वर्चस्ववादापासून समग्रतेकडे आणि व्यक्तीला सार्वभौमिकतेच्या प्राकृतिक न्याय आणि विविधतेचे सहअस्तित्व व विवेकाच्या दिशेने उत्प्रेरित करतात.
भारताची जनता आणि भारतीय महिला या दोघांचेही निर्णय कोणीतरी दुसरं घेतं आणि ते सहन करतात, शोषणाचे बळी पडतात पण त्याच्याविरुद्ध आवाज उठवत नाहीत. भारतात आज सावित्रीच्या पुढाकाराने शिकले, पण सवित्री घडवू शकले नाहीत. कारण प्रश्न आहे रचनात्मक पुढाकाराचा, न्यायसंगत वागण्याचा, माणूस म्हणून जगण्याचा ! माझ्यासाठी पुढाकार कोण घेणार ? या मानसिकतेवर “लोक- शास्त्र सावित्री” हे नाटक वैचारिक प्रहार करते.
कला माणसात विवेक जागवते, माणसाला माणूस असण्याचा बोध करून देते. म्हणूनच सांस्कृतिक क्रांतीचे सृजनकार या भूमिकेला अंगीकारण्याची ही वेळ आहे. मानवतेसाठी व विश्वाच्या कल्याणासाठी सृजन करणारा सृजनकार काळासोबत लढतो. आपला नवीन काळ निर्माण करतो. “थिएटर ऑफ रेलेवन्स” नाटयसिध्दांताचे “लोक- शास्त्र सावित्री” हे नाटक युगपरिवर्तनाचा काळ रचते.