
मडगाव :
कधीकाळी कला अकादमीचं इफ्फीसाठीच नूतनीकरण झालं आणि कालांतराने ती वास्तू भ्रष्टाचाराचं स्मारक ठरली. आता रवींद्र भवन मडगाव वाचवण्याची वेळ आली आहे, असे कलाकार व गोवा मनोरंजन संस्थेचे माजी सदस्य विशाल पै काकोडे यांनी म्हटले आहे.
रवींद्र भवन, मडगावचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी इफ्फीच्या तयारीसाठी मुख्य प्रेक्षागृह दोन महिने बंद ठेवण्याची घोषणा केली. यावर प्रतिक्रिया देताना विशाल पै काकोडे यांनी पाय तिआत्रीस्ट प्रेक्षागृह चित्रपटगृहात रूपांतरित केलं जाणार आहे का? आणि यामुळे सध्याच्या प्रेक्षागृहाच्या ध्वनीप्रणाली व रचनेवर काय परिणाम होणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
गेल्या पाच वर्षांत कोट्यवधी रुपये नूतनीकरण व दुरुस्तीसाठी खर्च केल्यानंतर पुन्हा दोन महिने प्रेक्षागृह बंद ठेवण्याचा निर्णय संशयास्पद आहे. रवींद्र भवन मूळ उद्देशापासून दूर जाऊन दुसऱ्याच कारणांसाठी वापरला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
रवींद्र भवन हे नाटक, नृत्य, संगीत अशा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणांसाठी व प्रशिक्षणासाठी बांधण्यात आलं होतं. आता ते चित्रपटगृहात रूपांतरित करण्याचा प्रयत्न सुरू आहे का? जर असं असेल तर त्याचे परिणाम कला अकादमीसारखेच विनाशकारी ठरतील – ध्वनीप्रणाली बिघडेल, रचना खराब होईल आणि सांस्कृतिक ओळख नष्ट होईल. या नूतनीकरणामागील सल्लागार कोण आहे? एकूण खर्च किती आहे? कंत्राटदार कोण? या सगळ्याची माहिती सार्वजनिक केली पाहिजे, अशी मागणी विशाल पै काकोडे यांनी केली.
रवींद्र भवनच्या अॅनेक्स इमारतीचा वापर का केला जात नाही? स्थानिक मुलांसाठी संगीत, नृत्य, नाट्य प्रशिक्षणाचे वर्ग का सुरू केले जात नाहीत? रवींद्र भवनात जवळपास ६० टक्के निधी गोमंतकीय कलाकारांऐवजी बाहेरच्या कलाकारांच्या कार्यक्रमांवर खर्च केला जातोय. अध्यक्षांशी संबंधित एका संस्थेला प्रचंड अनुदान दिलं जातं, आणि इतर मडगावमधील संस्थांची उपेक्षा होते, असा आरोप विशाल पै काकोडे यांनी केला.
रवींद्र भवन ही संस्था सासष्टी तालूक्यातील कलाकार व जनतेसाठी आहे. मात्र कार्यकारी मंडळातील बहुतांश सदस्य मडगाव आणि फातोर्ड्याचे आहेत. एका राजकीय पक्षाशी संबंधित, आणि कलाविश्वाशी कोणताही संबंध नसलेली काही मंडळी या मंडळात नेमली गेली आहेत, हे अत्यंत गंभीर असून संस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतं, असंही विशाल पै काकोडे म्हणाले.
रवींद्र भवनची मूळ रचना, हेतू आणि सांस्कृतिक अधिष्ठान कायम राखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावलं उचलावीत. रवींद्र भवन हे गोमंतकीय कला व संस्कृतीचं केंद्र राहिलं पाहिजे, राजकारण व चुकीच्या प्राधान्यक्रमाचं बळी ठरू नये, असं आवाहन विशाल पै काकोडे यांनी केले आहे.