
अकेशिया पाम्स’ रिसॉर्ट आता
संपूर्णपणे महिला संचलित…
‘महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेड’चा प्रमुख ब्रँड असलेल्या ‘क्लब महिंद्रा’ने एक क्रांतिकारी पाऊल उचलत गोव्यातील अकेशिया पाम्स रिसॉर्टचे रूपांतर पूर्णपणे महिलांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या रिसॉर्टमध्ये केले आहे. ‘क्लब महिंद्रा’ संपूर्ण पोर्टफोलिओमधील हे पहिलेच असे रिसॉर्ट असून हा एक ऐतिहासिक टप्पा आहे.
लिंगसमभाव, महिलांचा कामकाजात समावेश आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठीचे योगदान यांविषयी क्लब महिंद्रा किती गंभीर आहे, हे या निर्णयामुळे दिसून येते. या रिसॉर्टचे व्यवस्थापन करण्यापासून क्लबमध्ये येणाऱ्या अतिथींची सेवा करण्यापर्यंतच्या सर्व बाबी केवळ महिलाच सांभाळत आहेत. रिसॉर्ट सांभाळणाऱ्या या महिला विविध पार्श्वभूमीतील आहेत. काहीजणी सुरक्षारक्षक आहेत, तर काहीजणी तांत्रिकी सहाय्य (इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल) अशा अभियांत्रिकी सेवा सांभाळत आहेत. रिसॉर्टमधील उद्यान, स्वयंपाकघर ही ठिकाणेदेखील महिलांच्याच अधिपत्याखाली आहेत. पारंपरिकपणे पुरुषप्रधान असलेल्या क्षेत्रांमध्ये या महिला पहिल्यांदाच काम करीत आहेत. रिसॉर्टमधील कामांमुळे त्या आपले कौशल्य विकसित करू शकत आहेत, एवढेच नव्हे तर आपले करिअरही घडवू शकत आहेत. या उपक्रमामुळे आतिथ्य क्षेत्रात अधिक समावेशक व न्याय्य कार्यसंस्कृती निर्माण होईल आणि जागतिक पातळीवर एक आदर्श उभा राहील.
स्थानिक महिला उद्योजिका व कारागिरांशीही क्लब महिंद्रा सहकार्य करत असून त्यांच्या कौशल्याचा आणि उत्पादनांचा रिसॉर्टच्या सेवा व अनुभवांमध्ये समावेश केला जात आहे. यामुळे स्थानिक समुदायाचा विकास व शाश्वत उपजीविका यांनाही चालना मिळत आहे.
या ऐतिहासिक उपक्रमाविषयी ‘महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज भट म्हणाले, “गोव्यातील आमचे अकेशिया पाम्स रिसॉर्ट आता पूर्णपणे महिलांच्या नेतृत्वाखाली आहे, याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. लिंगसमभाव, समावेश आणि महिला सशक्तीकरणासाठी आमच्या दृढ बांधिलकीचे हे प्रतीक आहे.”
‘महिंद्रा हॉलिडेज’च्या मनुष्यबळ विभागाच्या प्रमुख तन्वी चो़कसी म्हणाल्या, “समाजातील कोणत्याही गटाचा खरा समावेश हा केवळ हेतूपुरता मर्यादित नसावा, असे महिंद्रा हॉलिडेजमध्ये आम्ही समजतो. आम्ही अशा कार्यसंस्कृतीचे वातावरण निर्माण करत आहोत, जिथे महिला केवळ टिकून राहत नाहीत, तर त्यांची प्रगती होते, त्या नेतृत्व करतात आणि अभियांत्रिकी, सुरक्षा व स्वयंपाकघर व्यवस्थापन अशा पारंपरिक पुरुषप्रधान भूमिकांमध्ये आपली छाप सोडतात. ‘क्लब महिंद्रा’चे अकेशिया पाम्स रिसॉर्ट महिलांच्या नेतृत्वाखाली रूपांतरित होणे हे रूढकल्पनांना छेद देणारे, क्षमतेला वाव देणारे आणि संपूर्ण आतिथ्य क्षेत्राला प्रेरणा देणारे पाऊल आहे.”