‘दाबोळी विमानतळाचे ‘घोस्ट एअरपोर्ट’ मध्ये रूपांतर करण्यासाठीच टॅक्सीवाल्यांना दोष’
पणजी :
मोपा विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर दाबोळी विमानतळ “घोस्ट एअरपोर्ट” होणार असल्याचा इशारा मी विधानसभेत दिला होता. वाहतूक मंत्री मॉविन गुदीन्हो यांनी आता दोषारोपाचा खेळ सुरू केला जे दाबोळी विमानतळ बंद करण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दाबोळी विमानतळाच्या भवितव्याबद्दल स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दोन्ही विमानतळांच्या भवितव्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. गोमंतकीय कोणत्याही परिस्थितीत दाबोळी विमानतळ बंद करू देणार नाहीत, असे युरी आलेमाव यांनी स्पष्ट केले.
गोव्यातील टॅक्सी चालक अॅप आधारित सेवांकडे वळले नाही तर दाबोळी विमानतळ बंद होईल, या वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी केलेल्या विधानावर ते प्रतिक्रिया देताना युरी आलेमाव यांनी वरील इशारा दिला.
परिवहन मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी केलेले विधान हे लोकांना पुढे काय वाढून ठेवले आहे याबद्दल सतर्क करण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि सहकार क्षेत्र बंद करून खाजगी व्यावसायीक व भांडवलदारांना प्रोत्साहन देण्याचे एकमेव धोरण आहे.
भाजप सरकारला दाबोळी विमानतळ बंद करून खाजगी कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या मोपा विमानतळाला प्रोत्साहन द्यायचे आहे. त्याचप्रमाणे स्थानिकांचा टॅक्सी व्यवसाय संपवून गोव्यात बहुराष्ट्रीय टॅक्सी ऑपरेटर आणायचे आहेत, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला आहे.
सुरक्षित पायाभूत सुविधांसोबत चांगली सार्वजनिक वाहतूक सेवा देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. परिवहन मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी गोव्यातील मृत्यूचे सापळे बनलेले रस्ते सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ज्यांच्या निष्काळजीपणामुळे शेकडो जीवघेणे अपघात झाले, अशा महामार्ग बांधकाम ठेकेदारांवर कारवाई करण्याबाबत वाहतूक मंत्री गप्प का? असा थेट सवाल युरी आलेमाव यांनी विचारला आहे.
सरकारने टॅक्सी चालकांना तसेच इतर भागधारकांना विश्वासात घेऊन टॅक्सी चालकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर समाधानकारक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सरकारची धमकीची भाषा यापुढे चालणार नाही, असा इशारा युरी आलेमाव यांनी दिला.