
LPG दरवाढीविरोधात महिला काँग्रेस आक्रमक
केंद्र सरकारने LPG सिलिंडर आणि इंधनाच्या किमती वाढविल्याने प्रदेश महिला काँग्रेसने निषेध केला. याविरोधात देशभर काँग्रेसने आंदोलन छेडले असून गोव्यात आंदोलन होणार आहे. लवकरच राज्य सरकारला याबाबत निवेदने देण्यात येणार असल्याचे प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. प्रतिक्षा खलप यांनी सांगितले.
उत्तर गोवा काँग्रेस कार्यालयात मंगळवारी संध्याकाळी खलप यांनी पत्रकार परिषद घेतली. केंद्र सरकारने केलेली ही LPG दरवाढ मागे घ्यावी. सिलिंडर आणि इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त असलेल्या मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय लोकांची भाजप सरकारला काहीही काळजी नाही. या दरवाढीचा सामान्य माणसांवर मोठा ताण आला आहे, असे खलप यांनी सांगितले.
महिला काँग्रेसच्या वतीने या दरवाढीचा आपण तीव्र निषेध करते. महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या गरीब, मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांकडे भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने पूर्ण दुर्लक्ष केल्याचे हे आणखी एक उदाहरण आहे. रोजंदारीवर अवलंबून असलेल्या अनेक विधवा आणि एकट्या महिला आहेत. या महिला दरमहा ५००० रुपये कमवीत असेल तर ८५० रुपये LPG गॅस सिलिंडर खरेदी करण्यासाठी जातात, असे त्या म्हणाल्या.
LPG दरवाढीचा फटका महिलांना…
या दरवाढीचा फटका महिलांना, विशेषतः गृहिणींना सहन करावा लागत आहे. स्वयंपाकाच्या गॅससारखी मूलभूत गरज लाखो कुटुंबांना परवडणारी नाही, हे लज्जास्पद आहे. आम्ही LPGची दरवाढ तत्काळ मागे घेण्याची मागणी करतो आणि सरकारला या देशातील लोकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची विनंती करतो, असे त्या म्हणाल्या.
उत्तर गोवा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा दीपा धुपडाळे आणि थिवी महिला काँग्रेस ब्लॉकच्या सदस्या आणि उत्तर गोवा जिल्हा अध्यक्षा मॉलई दे गामा सिल्वा यांनीही टीका केली. यावेळी लिबी मेदेरा उपस्थित होत्या.