पणजी :
एनडीए सरकारने जारी केलेले निवडणूक रोखे रद्द करणे हा केंद्र सरकारवर बसलेली चपराक आहे. हा निकाल लोकशाही निवडणूक प्रक्रियेच्या विजयाचे लक्षण आहे, असे काँग्रेसचे आमदार ॲड. कार्लोस आल्वारीस फरैरा यांनी म्हटले आहे.
पणजी येथील काँग्रेस भवनात पक्षाचे सरचिटणीस ॲड. श्रीनिवास खलप यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत कार्लोस फरैरा यांनी मागच्या दारातून भ्रष्टाचार केल्याबद्दल भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले.
इलेक्टोरल बाँड योजना अतिशय अपारदर्शक होती. सदर योजनेअंतर्गत कोण निधी देत आहे हे जाणून घेण्याचा अधिकार जनतेला नव्हता. मात्र सत्ताधारी सरकारकडे सर्व माहिती उपलब्ध होती. विरोधकांना मात्र काहीच माहिती उपलब्ध होत नव्हती. भाजपला त्यांना कोण निधी देत आहे हे कळत होतेच त्याशिवाय इतर विरोधी पक्षाना कोण निधी देत आहे हे सुद्धा कळत होते असे कार्लोस फेरैरा यांनी सांगितले.
राजकीय पक्षांना बॉंडद्वारे निधी दिल्यानंतर भाजप सरकारने कोणाला त्रास दिला, कोणावर छापा टाकला हे पाहणे आता रंजक ठरणार आहे. यादी बाहेर पडल्यानंतर आम्ही ईडी, सीबीआय आणि आयकर किंवा केंद्र सरकारच्या इतर कोणत्याही एजन्सीने केलेल्या कारवाईचे विश्लेषण करू शकू, असे ॲड. कार्लोस फरैरा यांनी नमूद केले.