”हा’ निकाल म्हणजे ‘हराम राज्य’ संपवण्याची नांदी’
पणजी :
निनावी निवडणूक रोखे रद्द केल्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार. कोणाकडून काय, कधी आणि का मिळाले हे देशाला लवकरच कळेल. भाजपचे हराम राज्य संपवण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल!, असे काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे.
राजकीय पक्षांच्या निधी उभारणीसाठी भाजप सरकारने सुरू केलेले निवडणूक रोखे सर्वोच्च न्यायालयाने आज रद्द केले त्यावर प्रतिक्रिया देताना अमित पाटकर यांनी असंवैधानिक कृत्यांमध्ये गुंतल्याबद्दल भाजपला फटकारले.
नागरिकांच्या माहितीचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. बेकायदेशीर निवडणूक रोखे योजनेचा बचाव करण्यासाठी कायदेशीर युक्तिवादांद्वारे सुटकेचा मार्ग शोधण्याचा सरकारचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडला आहे, असे अमित पाटकर यांनी नमूद केले.
सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल म्हणजे पारदर्शकता व जबाबदारी यांचा विजय आहे, असे अमित पाटकर म्हणाले.
दिल्लीतील सेव्हन स्टार भाजप मुख्यालयासाठी निधी कोठून आला, गोव्यातील भाजपच्या प्रस्तावित कार्यालयासाठी प्लॉट कोणी दिला, मेगा टेलिप्रॉम्प्टर रॅलीज प्रायोजित कोणी केल्या हे सर्व येत्या काही दिवसात जगाला कळेल, असा टोला अमित पाटकर यांनी हाणला.