पणजी :
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने २०२४ च्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. कृषी क्षेत्रातील योगदानासाठी गोव्यातील सावईवेरे-फोंडा येथील शेतकरी संजय अनंत पाटील यांना यावर्षीचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याआधी त्यांना नैसर्गिक शेतीसाठी भारतीय कृषी संशोधन संस्थेचा २०१९-२० सालचा ‘कृषीरत्न’ पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी १० एकर नापीक जमिनीवर कुळागार तयार केली होती.
पुरस्कारप्राप्त संजय पाटील यांनी कुळागार करण्यासाठी गायीच्या शेणाचा वापर करून जीवामृताची निर्मिती केली. पाटील यांनी आपल्या कुळागरात कित्येक किमी. लांब भुयारे मारून डोंगरदऱ्यातून पाणी आणण्याची किमया साध्य केली आहे. तसेच पाण्याची कमतरता असल्याने ठिबक सिंचनाचा वापर करून नैसर्गिक शेतीही केली आहे. सध्या त्यांच्या कुळागारात काळी मिरी, काजू, अननस, नारळ अादी पिके घेतले जात आहेत. पाटील यांच्या प्रयत्नांमुळे अन्य शेतकऱ्यांनाही नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन मिळाले आहे.
विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी कृषी क्षेत्रातील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल संजय पाटील यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. हा गोव्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. पाटील यांना उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो, अशी सदिच्छाही आलेमाव यांनी व्यक्त केली.
दरम्यान, केंद्राकडून यंदा १३२ पद्म पुरस्कारांना मान्यता दिली आहे. रात्री उशिरा जाहीर झालेल्या यादीत ५ पद्मविभूषण, १७ पद्मभूषण याशिवाय ११० पद्मश्री पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. पद्मश्री पुरस्कारामध्ये पार्वती बरुआ, जागेश्वर यादव, चार्मी मुर्मू, सर्वेश्वर, सांगथामसहित अनेक मान्यवरांचा समावेश आहे. तर बिहारचे माजी मुख्यमंत्री कुरपरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’ देण्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती.
पद्मश्री पुरस्कारप्राप्त शेतकरी संजय पाटील यांचे अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील तसेच सकारात्मक बदल घडवणाऱ्या लोकांसाठी पद्मश्री देण्याची सुरू केलेली प्रथा वाखाणण्याजोगी आहे. : डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
मला मिळालेला ‘पद्मश्री’ पुरस्कार हा तमाम गोव्यातील शेतकर्यांचा सन्मान आहे. गेल्या दोन ते तीन तपांच्या तपश्चर्येचे हे फळ आहे. सावईवेरेत राहून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आपण आतापर्यंत जे प्रयत्न केले, त्याची दखल केंद्राकडून घेण्यात आली याचे समाधान वाटले. : संजय पाटील, पद्मश्री पुरस्कारप्राप्त शेतकरी