मडगाव :
रोजगारावरील स्कोच संस्थेने तयार केलेल्या अहवालावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रतिक्रीया पाहता ते सदर संस्थेचे प्रवक्ते असल्यासारखे बोलल्याचे स्पष्ट होते. जर एलपीजी ₹1000 वर, इंधन दर ₹100 प्रति लीटरपेक्षा जास्त, जीवनावश्यक वस्तूंच्या सतत वाढत्या किमती, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी वाढणे हे विकसित भारतचे प्रतिबिंब असेल तर देवा भारताला वाचव, असा सणसणित टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारतचे मिशन स्कोच अहवालात प्रतिबिंबित होत असल्याच्या केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात, भ्रष्टाचार आणि महागाई नियंत्रणात अपयशी ठरल्याबद्दल भाजप सरकारवर कठोर टीका केली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याची आर्थिक स्थिती आणि राज्यातील रोजगार परिस्थिती यावर “श्वेतपत्रिका” प्रसिद्ध करावी. भाजप सरकारने गेल्या अकरा वर्षांत किती नोकऱ्या दिल्या आणि भाजपने गोव्याला आर्थिक दिवाळखोरीत कसे ढकलले, हे सर्वांना कळू द्या, असे उघड आव्हान युरी आलेमाव यांनी दिले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रोजगार संधी निर्माण झाल्या, रोजगार तयार झाले असे बेजबाबदार वक्तव्य करून राज्यातील सर्व बेरोजगार युवक, गृहिणी आणि सामान्य माणसांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. भाजपची असंवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आली आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.
गेल्या दहा वर्षांत भाजप सरकारच्या गरीब-विरोधी व श्रीमंताना पोषक धोरणांमुळे सामान्य जनतेला सर्वाधिक त्रास सहन करावा लागला आहे. नोटाबंदी, कोविड गैरव्यवस्थापन आणि जीएसटीची चुकीची अंमलबजावणी यामुळे लघु आणि मध्यम उद्योगांचा कणा मोडला आहे. सरकार नोकऱ्या देण्यात आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात अपयशी ठरले आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
बेरोजगारीत गोवा देशात अव्वल असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील निती आयोगाने प्रकाशित केलेल्या अहवालाकडे मला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे लक्ष वेधायचे आहे. गोव्यात बेरोजगारी वाढल्याचे दर्शविणारे सिएमआयई अहवालांची मी मुख्यमंत्र्यांना आठवण करून देऊ इच्छितो, असे युरी आलेमाव म्हणाले.
युवा न्याय, नारी न्याय, किसान न्याय, श्रमिक न्याय आणि हिस्सेदारी न्याय ही कॉंग्रेसची वचने जून 2024 पासून भारतातील सामान्य लोकांसाठी आनंदाचे दिवस आणतील. गोवा काँग्रेसच्या 21 वचनबद्धतेमूळे गोव्याची ओळख अबाधित राहिल, असे युरी आलेमाव म्हणाले.