‘सरकारच्या घोटाळ्यांवर विजय सरदेसाईंचे मौन का?’
मडगाव :
एकेकाळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असलेले गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई 12 वर्षांपूर्वीच्या काँग्रेस सरकारकडे बोट का दाखवतात आणि 2017 मध्ये त्यांच्या पक्षांच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेल्या भाजप सरकारच्या अनेक घोटाळ्यांबद्दल का बोलत नाहीत? असा सवाल काँग्रेसचे सोशल मीडिया प्रभारी दिव्या कुमार यांनी केला.
गोवा फॉरवर्डचे फातोर्डाचे एकमेव आमदार विजय सरदेसाई यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारवर केलेल्या थेट शाब्दीक हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिव्या कुमार यांनी विजय सरदेसाई यांनी काँग्रेस पक्षावर केलेल्या टीकेचा निषेध केला आहे.
फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई आपल्या राजकीय भवितव्याबाबत संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे ते इंडिया ब्लॉक बद्दल बोलतात आणि दुसरीकडे ते सरकारी पैशांतून पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या भाजपच्या प्रचार सभेसाठी योग्य जागा शोधण्यासाठी हाफ पँट घालून मिनी-बसमध्ये फिरतात, असे दिव्या कुमार म्हणाले.
माझ्यासारख्या समर्पित आणि निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांना एकेकाळी काँग्रेस पक्षात असलेल्यांकडून असे अवास्तव टोमणे ऐकणे खूप दुखावते. मी विजय सरदेसाई यांना विनंती करतो की त्यांनी पुन्हा अशी विधाने करण्यापासून दूर राहावे, असे दिव्या कुमार म्हणाले.
गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सहयोगी असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाच्या नेत्याकडून हे ऐकून निराशा झाली. आशा आहे की त्यांना सुबुद्धी येईल. आमच्या तीन आमदारांनी गोव्याचा आवाज बनून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि नेते राहुल गांधी यांचा ऐक्याचा संदेश कायम पूढे न्यावा, असे काँग्रेसच्या सोशल मीडिया समन्वयक शमिला सिद्दीकी यांनी म्हटले आहे.