
‘संकल्प आमोणकर ‘खंडणी मंत्री’ आहेत का?’
पणजी :
मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर हे डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचे खंडणी मंत्री आहेत का? असा प्रश्न करुन, मुरगाव पोर्ट ट्रस्टमधील दादागिरीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.
खंडणीसाठी दादागिरी हे भाजपचे बीजनेस मॉडेल आहे. मुख्यमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे हे खंडणी रॅकेटचे भागधारक आहेत आणि त्यामुळेच त्यांनी मौन बाळगले आहे, असा दावा अमित पाटकर यांनी केला.
मुरगाव बंदरावरून बॉक्साईटच्या वाहतुकीला भाजपचे आमदार संकल्प आमोणकर यांनी अडवणुक केल्याच्या प्रसारमाध्यमांच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस अध्यक्षांनी गोव्यातील “खंडणी माफिया” ला प्रोत्साहन दिल्याचा आरोप भाजपवर केला आहे.
बॉक्साईटची वाहतूक मुरगावचे आमदार संकप आमोणकर यांनी दहा दिवसांहून अधिक काळ रोखून धरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने याकडे डोळेझाक केली, असे अमित पाटकर म्हणाले.
भाजप प्रत्येक गोष्टीत माया कमावण्याची संधी शोधत असतो. भाजपने खंडणीखोरांना प्रशिक्षित केले आहे जे छोट्या भाजी विक्रेत्यांपासून मोठ्या व्यावसायिकांकडून “हफ्ता” गोळा करतात, असा दावा अमित पाटकर यांनी केला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे हे भाजपच्या ‘खंडणी माफिया’चे मुख्य आश्रयदाते आहेत. गोमंतकीयांनी आताच सावध व्हावे आणि येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकवावा, असे अमित पाटकर म्हणाले.