मडगावातील अपुऱ्या आरोग्य सुविधांबाबत आरोग्यमंत्र्यांना निवेदन
मडगाव :
मडगाव येथील रहिवासी श्रीधर उर्फ शिरीष पै काणे यांच्या अपघाती मृत्यूच्या अत्यंत दुर्दैवी घटनेने दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील अपुऱ्या आरोग्य सुविधांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. शनिवार, 24 ऑगस्ट 2024 रोजी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात अत्याधुनिक आरोग्य सुविधा आणि सुसज्ज रुग्णवाहिका न मिळाल्याने आणखी एकाचा जीव गेला, असे युवा नेते प्रभव नायक यांनी पुढाकार घेवून गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना सादर केलेल्या निवेदनात मडगावच्या नागरिकांनी म्हटले आहे.
या निवेदनावर माजी आमदार उदय भेंब्रे, ॲड. क्लीओफात आल्मेदा कुतिन्हो, डॉ. व्ही. व्ही. कामत, माजी नगराध्यक्ष अजित हेगडे, राधाकांत पै काणे, महेंद्र आल्वारीस, दीप कारापूरकर, विनोद शिरोडकर आणि इतरांनी सह्या केल्या आहेत. नागरिकांकडून तसेच निवडून आलेल्या प्रतिनिधींकडून सातत्याने मागणी करूनही सरकार सदर इस्पितळ पूर्णपणे कार्यांवित करण्यात अपयशी ठरले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
इस्पितळातील अतिदक्षता विभागात प्रगत उपकरणे बसवून तो पूर्णपणे कार्यरत आहे करण्याची तातडीने गरज आहे. न्यूरोसर्जरी युनिट, कॅथ लॅब, ट्रॉमा युनिट आणि पुरेशा मनुष्यबळ संसाधनांसह इतर आरोग्य सेवा सुविधा स्थापन करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
हॉस्पिसीयो इस्पितळात 173 रिक्त पदे आहेत आणि सध्या 193 कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट/बॉन्ड/तात्पुरत्या तत्त्वावर काम करत आहेत. गेल्या एका वर्षात रिक्त पदांची टक्केवारी 20 वरून सुमारे 27 टक्के वाढली आहे. सरकारने सर्व रिक्त पदे त्वरित भरणे आणि नियमितपणे कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक आहे ज्यामूळे कर्मचाऱ्यांची जबाबदारी सुनिश्चित करणे सोपे होईल, असे निवेदनात नमूद केले आहे.
रिक्त पदांमध्ये वैद्यकीय अधीक्षक सह उपसंचालक, वरिष्ठ बालरोगतज्ञ, वरिष्ठ शल्यचिकित्सक, मेडिको लीगल अधिकारी, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी तसेच विविध कनिष्ठ पदे तसेच तंत्रज्ञ,एमटीएस यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे परिणामी रूग्णांना सेवा देण्यास विलंब होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
मडगावच्या नागरिकांनी किमान 2 कार्डिएक रुग्णवाहिका आणि 5 इतर श्रेणीतील रुग्णवाहिका पूर्णपणे दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळासाठी देण्याची मागणी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. 108 रुग्णवाहिका सेवा सदर इस्पितळाच्या नियंत्रणाखाली नाही तसेच 108 रुग्णवाहिका सेवेची कार्यप्रणाली हे श्रीधर पै काणे यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यास झालेल्या उशीराचे मुख्य कारण होते, असे निवेदनात म्हटले आहे.
सध्या, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय हे एक “रेफरल हॉस्पिटल” बनले आहे. सरकारी आकडेवारीनुसार गेल्या 4 वर्षात 17425 रुग्णांना इतर इस्पितळांत पाठविण्यात आल्याचे स्पष्ट होते. जानेवारी ते जून 2024 पर्यंत 2389 रुग्णांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आणि 71 रुग्णांना अपुऱ्या सुविधांमूळे खाजगी हॉस्पिटलमध्ये पाठवल्याचे सांगून नागरिकांनी विश्वजीत राणेंचे लक्ष वेधले आहे.
सदर निवेदनात आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मडगावच्या नागरीकांसह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाला भेट द्यावी व समस्या जाणून घ्याव्यात तसेच सदर इस्पितळाच्या रिकाम्या जागेचा पूर्ण वापर करावा तसेच रुग्णांना गोमेको व खासगी इस्पितळात का पाठविले जाते याची सखोल चौकशी करावी, शिरीष काणे यांना गोमेकोत पाठविण्यास झालेल्या दिरंगाईची चौकशी करावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.