दिगंबर कामत यांनी उत्तर देणे गरजेचे : प्रभव नायक
मडगाव :
2007-2012 मध्ये काँग्रेस सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांनी काहीही केले नाही, फक्त तिजोरी लुटली, असे गंभीर वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. आता मुख्यमंत्र्यांना गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी उत्तर देणे गरज आहे. दिगंबर कामतांच्या सरकारातील सहा कॅबिनेट मंत्री आता डॉ. प्रमोद सावंतांच्या मंत्रिमंडळात आहेत, असा टोला युवा नेते प्रभव नायक यांनी हाणला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना, प्रभव नायक यांनी काँग्रेस सरकारमधील तत्कालीन मंत्री रवी नाईक, सुदिन ढवळीकर, विश्वजित राणे, आलेक्स सिक्वेरा, आतानासियो मोन्सेरात आणि नीळकंठ हळर्णकर हे आता भाजप सरकारात असल्याकडे लक्ष वेधले.
2007 ते 2012 पर्यंत गोव्याचे मुख्यमंत्री असलेले मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर मुख्यमंत्र्यांनी गंभीर आरोप केले आहेत. आता मडगावचे आमदार मुख्यमंत्र्यांना उत्तर न देता गप्प बसले तर तो मडगावकरांचा अपमान ठरेल, असा दावा प्रभव नायक यांनी केला आहे.
दिगंबर कामत यांनी काँग्रेस- भाजप – कॉंग्रेस -भाजप असे पक्ष बदलले असतानाही मडगावकरांनी त्यांना सातत्याने निवडून दिले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे वक्तव्य म्हणजे एक प्रकारे मडगावच्या नागरिकांचा अपमान आहे. आपली भूमिका स्पष्ट करणे हे आता आमदार दिगंबर कामत यांचे कर्तव्य आहे, असे प्रभव नायक म्हणाले.