आजच्या स्त्रिया या सर्वक्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तितक्याच सशक्तपणे काम करत आहेत, अशावेळेला आपण स्त्री आहोत म्हणून कोणत्याही परिस्थितीत स्वतःकडे कमीपणा त्यांनी घेता कामा नये, महिलांनी स्वतःचा आब राखला तरच समाजदेखील त्यांचा राखेल म्हणून, प्रत्येक स्त्रीने सदोदित आत्मसन्मान राखलाच पाहिजे, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी केले. प्रियोळ प्रगती मंचच्यावतीने खांडोळा येथील बिग बी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ‘श्रीमती सन्मानोत्सव’ उपक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी राज्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, प्रियोळ प्रगती मंचचे अध्यक्ष युगांक नायक, आणि समन्वयक तथा कार्यक्रम प्रमुख रीना गावडे, उत्तर गोवा जिल्हा परिषदेचे सदस्य श्रमेश भोसले, प्रियोळ भाजप मंडळाच्या अध्यक्षा अनिशा गावडे, प्रदेश भाजप महिला नेत्या सुलक्षणा सावंत आणि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते वत्सला गावडे, भारती भट्टा, कल्पना नाईक, रत्ना गावडे यांना घर -संसार संभाळून करत असलेल्या त्यांच्या वैविध्यपूर्ण सामाजिक सेवेबद्दल ‘श्रीमती सन्मान’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मानपत्र, मानचिन्ह, शाल – श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी प्रियोळ आणि परिसरातील विविध महिला गटांनी तसेच महिला कलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले. तर, प्रणिता सावंत आणि शलाका लवंदे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन केले.
हेमा नायक ‘गोमंत प्रतिभा पुरस्कारा’ने सन्मानित
गोव्याच्या साहित्य, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात मोलाची भर घालणाऱ्या महिलांना
संस्थेच्यावतीने गोमंत प्रतिभा या विशेष पुरस्काराने यावर्षापासून सन्मानित करण्यात सुरुवात केली असून, यावर्षीचा पहिलाच पुरस्कार साहित्य अकादेमी पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध कोंकणी लेखिका, प्रकाशिका आणि महिला संघटिका हेमा नायक यांना वर्षा उसगांवकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र, मानचिन्ह, शाल – श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हेमा नायक यांच्या आजवरच्या साहित्य आणि सामाजिक सेवेबद्दलची कृतज्ञता म्हणून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत असल्याचे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.
हेमा सरदेसाईंच्या गाण्यांवर महिलांनी धरला ताल
या कार्यक्रमात गोव्याच्या गानकोकिळा हेमा सरदेसाई यांनीदेखील आपली विशेष उपस्थिती नोंदवली. आणि त्यांनी भाषण वगैरे न करता आपली काही कोंकणी आणि हिंदी गाणी गायिली. आणि त्यांच्या या गायनाला उपस्थित सर्व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला चक्क गायन-नृत्य मैफिलींमध्ये परावर्तित केले. उपस्थित सर्व अबालवृद्ध महिलांनी यावेळी गाण्यावर ताल आणि ठेका धरत मनमोकळेपणाने नृत्य करत, कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला.
कोट :
ज्याप्रमाणे जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवले आणि स्वराज्याची स्थापना केली. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर आज प्रत्येक महिलेने ठेवणे गरजेचे आहे. आणि हे करत असताना नकारात्मक विचार आणि नकारात्मक व्यक्ती यांना आपल्यापासून नेहमीच दूर ठेवणे नितांत गरजेचेच आहे. कारण स्त्री हि सदैव सकारात्मकच आणि सृजनात्मक असते, पण नकारार्थी विचार आणि लोक तिला तिच्या ध्येयामध्ये अडथळा तयार करतात, हा अडथळा स्त्रियांनी स्वतःच बाजूला केला पाहिजे आणि सकारात्मक समाजाचा पाया घालण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले पाहिजे.
– गोविंद गावडे,
कला आणि संस्कृती मंत्री.