
Tahawwur Rana : २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणलं जाणार
Tahawwur Rana Extradiction : २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा आरोप असलेला तहव्वुर राणाला उद्या (१० एप्रिल) भारतात आणलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याचा त्याचा अर्ज अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ पावलं उचलले आहेत. आता तहव्वुर राणाला उद्या भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे.
तहव्वूर राणाला (Tahawwur Rana) भारतात आणण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) तीन वरिष्ठ अधिकारी अमेरिकेत पोहोचले असल्याची माहिती सांगितली जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी आशिष बत्रा यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय एनआयए पथकात उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.
सुरक्षा यंत्रणा अलर्ट :
दरम्यान, तहव्वुर राणाला (Tahawwur Rana) भारतात आणण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह आदी महत्वाच्या अधिकाऱ्यांबरोबर उच्चस्तरीय बैठक बोलवली असल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. तहव्वुर राणाला अमेरिकेतून विमानाने दिल्लीत आणलं जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, गुप्तचर विभागाचे संचालक तपन डेका, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि एनआयएचे संचालक सदानंद दाते हे देखील अमित शाह यांनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित होते. तसेच गृह मंत्रालयातील सूत्रांनी सांगितलं की, “राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक, तीन गुप्तचर अधिकाऱ्यांसह रविवारी तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेसाठी अमेरिकेत पोहोचले आहेत.”