‘हिमाचल’मध्ये काँग्रेसची मुसंडी
हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. येथे विधानसभेच्या ६८ जागांसाठी ४१२ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी १२ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात ७५.६ टक्के मतदान झाले होते. या राज्यात प्रत्येक पाच वर्षांत सत्ताबदल होतो. त्यामुळे यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आज (८ डिसेंबर) मतमोजणी होत असून लवकरच येथे कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे.
ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाच्या बड्या नेत्यांनी येथे जाहीर सभा घेतल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील येथे भाजपासाठी मतं मागितली होती. काँग्रेसच्याही बड्या नेत्यांनी या राज्यात जोमात प्रचार केला होता. एक्झिट पोलनुसार येथे भाजपाला २४ ते ३४ आणि काँग्रेसला ३० ते ४० जागा मिळण्याची शक्यता आहे.
मागील निवडणुकीत भाजपाने ६८ पैकी ४४ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली होती. तर काँग्रेसला केवळ २१ जागा जिंकता आल्या होत्या.