
कॅसिनो टाउनशिप व अणु ऊर्जा प्रकल्पाला ठाम विरोध : प्रभव नायक
मडगाव : गोवा सरकारने घेतलेल्या अलीकडील निर्णय धक्कादायक आहेत. पेडणे येथे काडा जमिनीचे रूपांतर करून एका कॅसिनो कंपनीला टाउनशिप उभारण्यास दिलेली परवानगी आणि केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी गोव्यात अणुऊर्जा (Nuclear) प्रकल्प स्थापन करण्याची केलेली घोषणा हे दोन्ही निर्णय गोव्यासारख्या नाजूक व पर्यावरणसंवेदनशील राज्यासाठी गंभीर प्रश्न निर्माण करतात, असे ‘मडगावचो आवाज’ आणि युवा नेते प्रभव नायक यांनी म्हटले आहे.
या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आम्ही वैज्ञानिक, पर्यावरणतज्ज्ञ, नागरी नियोजनतज्ज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना आवाहन करतो की त्यांनी पुढे येऊन या निर्णयांचे परिणाम गोमंतकीयांना समजावून सांगावेत. त्यांच्या स्वतंत्र आणि अभ्यासपूर्ण मतांमुळे गोव्याच्या पर्यावरणाचे आणि समाजरचनेचे रक्षण होऊ शकते. आम्हाला त्यांचा पाठिंबा, मार्गदर्शन आणि एकजूट हवी आहे, असे प्रभव नायक यांनी सांगितले.
पेडणेमधील मौल्यवान शेती जमिनीवर कॅसिनो उद्योगाशी संबंधित टाउनशिप उभारण्यात येणार आहे, ज्यामुळे गोव्याचे पारंपरिक कृषी क्षेत्रच संपुष्टात येण्याचा धोका आहे. ज्यांनी पिढ्यान् पिढ्या गोमंतकीय कणगांचे चिप्स व केळ्याचे चिप्स तयार झाले, त्या जमिनीवर आता कॅसिनोचे ‘चिप्स’ येणार का? हे व्यावसायीकरण केवळ शेतकऱ्यांचे विस्थापन करणार नाही, तर त्या भागाचा सामाजिक-सांस्कृतिक पायाच ढासळवणार आहे. आपण असा वारसा आपल्या पुढच्या पिढ्यांना देणार आहोत का?, असा सवाल नायक यांनी उपस्थित केला.
गोव्यात अणुऊर्जा (Nuclear) प्रकल्प उभारण्याचा प्रस्तावही अतिशय धोकादायक आहे. घनदाट लोकवस्ती, समुद्रकिनारा आणि पर्यटनाधिष्ठित अर्थव्यवस्था असलेल्या गोव्यासाठी अशा प्रकल्पाचा विचार करणेही अप्रामाणिक आहे. अणुऊर्जेच्या (Nuclear) विकिरणाचा धोका, अपघाताची शक्यता आणि दीर्घकालीन कचरा व्यवस्थापन यामुळे या प्रकल्पामुळे होणारा धोका गोव्याच्या भौगोलिक व सामाजिक परिस्थितीत बसणारा नाही, असे प्रभव नायक यांनी ठामपणे सांगितले.
अणुऊर्जा प्रकल्प म्हणजे गोव्याच्या निसर्ग, जीवनशैली आणि अस्तित्वावर सरळ हल्ला : काँग्रेस
हे सर्व निर्णय असे सुचवतात की सध्याचे राज्य व केंद्र सरकार तात्पुरता फायदा बघून बेदरकार उद्योगांना प्राधान्य देत असून दीर्घकालीन शाश्वत विकास व जनतेच्या हिताची तमा ठेवत नाही. आपल्या गोव्याची अस्मिता विक्रीसाठी नाही. आपली भूमी, आपले आरोग्य व आपले भविष्य हे कुठल्याही उद्योगसमूहांच्या हितासाठी बळी जाऊ देणार नाही, असे प्रभव नायक यांनी ठणकावून सांगितले.
गोमंतकीयांनी आतातरी एकत्र यावे, सरकारकडून पारदर्शकता मागावी व असले घातक निर्णय घेणाऱ्यांना जबाबदार धरावे. आपण आपल्या राज्याचे नैसर्गिक वैभव, कृषी परंपरा व सार्वजनिक आरोग्य यांचे संरक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. गोव्यास शाश्वततेवर आधारित भविष्य हवे आहे, शोषणावर नाही, असे आवाहन प्रभव नायक यांनी केले.