भाजपच्या मंत्रिमंडळातच बलात्कारी, महिलांना सुरक्षा कशी मिळेल?: इंडिया आघाडी
पणजी:
महिलांना सुरक्षित वातावरण देण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत, भाजप त्यांच्या पक्षात गुन्हेगारांचे स्वागत करत आहे, त्यामुळे अशा राजकारण्यांकडून सुरक्षा व न्यायाची अपेक्षा करता येणार नाही, असे इंडिया आघाडीच्या नेत्यांनी म्हटले आहे.
इंडिया आघाडीच्या गोव्याच्या प्रवक्त्या मनीषा उसगावकर (काँग्रेस), ॲड आश्मा बी (गोवा फॉरवर्ड) आणि सिसिल रॉड्रिगीस (आप) यांनी काँग्रेस हाऊस येथे संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले आणि म्हटले की सरकार महिलांचे संरक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
सिसिल रॉड्रिगीस म्हणाल्या की सुरक्षेच्या बाबतीत भारत 177 देशांमध्ये 128 व्या क्रमांकावर आहे. “आपला देश सुरक्षित आहे का? आपल्याला असुरक्षित राष्ट्र म्हटले जात आहे. गोव्यातही आपण सुरक्षित नाही. महिला आणि बालकांना सुरक्षित वातावरण देण्यात सरकार अपयशी ठरले आहे,” असे रॉड्रिगीस म्हणाल्या.
त्या म्हणाल्या की, सिद्धी नाईक खून प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करण्यात सरकार अपयशी ठरला आहे. “पर्वरी येथे एका मुलीची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह शेजारच्या राज्यात नेण्यात आला. अलीकडेच पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला, आणि एका ८२ वर्षांच्या महिलेची हत्या झाली. हे सर्व पाहिल्यास राज्यात गुन्हेगारी वाढत आहे हे स्पष्ट झाले आहे,” असे रॉड्रिगीस म्हणाल्या.
“भाजप आपल्या पक्षात गुन्हेगारांचे स्वागत करत आहेत. मग अशा पक्षाकडून काय अपेक्षा ठेवता येईल. गोव्यातही बलात्काराचे आरोप असलेले मंत्री आहेत,” असे तिने निदर्शनास आणून दिले.
आश्मा बी म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षांत महिलांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. “2019 ते 2023 पर्यंत, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पीडितांवर सुमारे 250 बलात्कार झाले आहेत आणि फक्त 4 आरोपींना शिक्षा झाली आहे. शिक्षेचे प्रमाण इतके कमी आहे ही सरकारला लाजिरवाणी गोष्ट आहे. याला जबाबदार कोण?, असा सवाल तिने केला.
“गोवा सुरक्षित ठिकाण आहे का? नाही, ते महिलांसाठी असुरक्षित आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ ही केवळ घोषणाच राहिली आहे, प्रत्यक्षात महिलांन सुरक्षा मिळत नाही. महिलांना फसवण्यासाठी या घोषणा आहेत का? मग असे असुनही भाजप महिला सक्षमीकरणाबाबत का बोलतात, असा सवाल त्यांनी केला.
आश्मा म्हणाल्या की, गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे.
मनीषा उसगावकर म्हणाल्या की, सायबर गुन्हे घडत आहेत, पण सरकार ते थांबवण्यासाठी करण्यासाठी काहीच करत नाही. पोलिसांवर राजकीय दबाव आहे. त्यांना खटले हाताळण्यासाठी मोकळे हात दिले पाहिजेत.
‘‘भाजप निवडणुकीच्या काळात महिला आरक्षणाबाबत बोलतो. पण प्रत्यक्षात महिलांना न्याय देण्यात अपयशी ठरत आहे,” असे ती म्हणाली.