
काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांचा थेट सरकारी नोकरभरतीला विरोध
पणजी :
भाजप सरकार जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष करत आहे. पीडब्ल्यूडी, जीएमसी, आरोग्य, पोलिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील भरती घोटाळ्यांपासून भाजप सरकारने धडा घेतलेला नाही. काँग्रेसने आमच्या २०२२ च्या जाहीरनाम्यात कर्मचारी निवड आयोगाच्या माध्यमातून न्याय्य सरकारी नोकरभरती करण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भ्रष्ट खातेवार थेट भरती पद्धतीकडे परत वळू नये. गोव्यातील तरुणांना गुणवत्तेवरच नोकऱ्या मिळायला हव्यात, असे काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे.
कर्मचारी निवड आयोगाला बायपास करून विभागीय भरती प्रक्रियेकडे परत जाण्याच्या भाजप सरकारच्या हालचालींबद्दल प्रतिक्रिया देताना काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी गोव्यातील तरुणांना “नोकरी विक्री” ला बळी पडू नका असा इशारा दिला.
काँग्रेस पक्षाने भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केल्यावर सरकारला विविध खात्यातील भरती प्रक्रिया रद्द करावी लागली होती. भ्रष्ट नोकरभरतीच्या पूर्वीच्या घटना लक्षात ठेवाव्यात असे मी गोव्यातील तरुणांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आवाहन करतो. ‘भाजप दलालांच्या फसव्या आश्वासनाच्या मोहात पडून आपले पैसे घालवू नका, असा इशारा अमित पाटकर यांनी दिला आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन रद्द करून विभागीय भरतीकडे परत जाण्याचे प्रयत्न सध्या सरकारी पातळीवर केले जात आहेत. “नोकरीची विक्री” सुलभ करण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. काँग्रेस या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. आम्ही भाजपला सुशिक्षित तरुणांची फसवणूक करू देणार नाही, असे अमित पाटकर म्हणाले.
काँग्रेसने भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून धरल्यानंतर २०२१ मध्ये पीडब्यूडीची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती, याची मला गोमंतकीयांना आठवण करून द्यायची आहे. त्यानंतर पणजीचे भाजप आमदार आंतानासीयो मोन्सेरात यांनीही तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री दिपक पावसकर यांच्यावर ७० कोटींच्या नोकरी घोटाळ्याचा आरोप करून काँग्रेसचा आरोप खरा ठरवला होता. २०२२ मध्ये, जीएमसी आणि आरोग्य विभागातील १३०० रिक्त पदांवर थेट भरती करण्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्याच वर्षी १४५ पोलीस उपनिरीक्षकांच्या भरतीत अनियमितता उघडकीस आल्याचे अमित पाटकर यांनी निदर्शनास आणले.
यंदा दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील नोकरभरती वादग्रस्त ठरली असून, यामूळे भाजप गोमंतकीय सुशिक्षीत तरुणांच्या भवितव्याशी खेळत असल्याचे परत एकदा उघड झाल्याचे अमित पाटकर म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांच्या थेट नोकरभरती करण्याच्या प्रयत्नांचा कॉंग्रेस पक्ष निषेध करीत आहे. गोमंतकीय युवकांना पैसे भरून नव्हे तर गुणवत्तेच्या आधारावर सरकारी नोकरी देणे सरकारची जबाबदारी आहे. कर्मचारी निवड आयोगाला डावलण्याच्या प्रयत्नांना कॉंग्रेस पक्षाचा कायम विरोध असेल असे अमित पाटकर यांनी सांगितले.