गोव्यात प्रथमच ‘Candlelight’ संगीत मालिकेचे आयोजन
गोव्यातील संगीतप्रेमींसाठी यंदाचा मे महिना खास ठरणार आहे. जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेली Candlelight® ही लाईव्ह संगीत मालिका आता प्रथमच गोव्यात दाखल होत असून, 15 मे रोजी Kala Academy येथे या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Live Your City तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये हजारो मेणबत्त्यांच्या प्रकाशात लोकप्रिय संगीत रचनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
या विशेष मालिकेत ‘Candlelight: Queen vs. ABBA’ आणि ‘Candlelight: The Best of Hans Zimmer’ हे दोन कार्यक्रम सादर होणार आहेत. Queen आणि ABBA यांच्या गाजलेल्या गाण्यांपासून ते संगीतकार Hans Zimmer यांच्या प्रसिद्ध धूनपर्यंत विविध शैलीतील संगीताचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. पियानोवादनाच्या माध्यमातून हे सादरीकरण होणार असून, कलाकारांची नावे लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
सांस्कृतिक महत्त्व असलेल्या Kala Academy येथे होणाऱ्या या कार्यक्रमामुळे गोव्यातील सांस्कृतिक वातावरणात नव्या प्रकारच्या संगीत अनुभवाची भर पडणार असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, सर्व वयोगटांसाठी खुल्या असलेल्या या कार्यक्रमांची तिकिटे INR 499 पासून उपलब्ध असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक सहभागी होण्याची शक्यता आहे.
‘Candlelight: Queen vs. ABBA’ हा कार्यक्रम 15 मे रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला असून, ‘Candlelight: The Best of Hans Zimmer’ हा कार्यक्रम त्याच दिवशी रात्री 8 वाजता रंगणार आहे. दोन्ही कार्यक्रमांचा कालावधी 60 मिनिटांचा असणार आहे.


