काणकोण:
मसाज पार्लर, वेश्याव्यवसाय आणि अंमली पदार्थांचा पुरवठा यासारख्या बेकायदेशीर कृत्यांमुळे काणकोणच्या समुद्र किनाऱ्याची आणि इतर भागाची बदनामी झाल्याचा दावा करत, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष वैष्णव पेडणेकर यांनी अशा अवैध धंद्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वैष्णव पेडणेकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि इतर संबंधित विभागांना काणकोणमध्ये उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीबद्दल लिहिले आहे आणि कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भूमिपुत्र व स्थानिक लोक कायदेशीर व्यवसाय करून सुद्धा त्यांच्यावर अधिकारी कारवाई करतात, असे त्यांनी म्हटले आहे.
“बाहेरील लोकांच्या बेकायदेशीर कामांवर कारवाई करण्याऐवजी ते स्थानिकांवर कारवाई करत आहेत. बेकायदेशीर कामांमध्ये गुंतलेल्यांनी अधिकाऱ्यांची ‘हफ्ता’ मागणी पूर्ण केली असावी, नाहीतर त्यांच्यावर कारवाई का होत नाही” असा प्रश्र्न त्यांनी उपस्थित केला.
“आम्हाला काणकोणमध्ये पर्यटनाचे चांगले आणि कायदेशीर उपक्रम हवे आहेत, येथे बेकायदेशीर प्रकार वाढू नये. मसाज पार्लर, वेश्याव्यवसाय, ड्रग्ज आणि ध्वनिप्रदूषणावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही,” असे वैष्णव पेडणेकर म्हणाले.
“एका अहवालांनुसार, व्यावसायिक लैंगिक क्रियाकलापांशी संबंधित मानवी तस्करीसाठी गोवा हे भारतातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे आणि मसाज पार्लरच्या नावाखाली भारतातील इतर राज्यांतून आणि परदेशातील मुली आणि महिलांना एजंट कडून राज्यात नोकऱ्या देण्याच्या बहाण्याने आणले जात आहे,” अशे पेडणेकर यांनी निदर्शनास आणले.
काणकोण तालुक्यात या पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचे रॅकेट फोफावत असल्याचे त्यांनी सांगितले. “काणकोण पालिकेच्या एका माजी नगरसेवकांनी देखील आरोप केला होता की काणकोणमधील बेकायदेशीर मसाज केंद्रांमधून देह व्यापार फोफावत आहे,” असे ते म्हणाले.
सीआरझेड, एनडीझेड, इको सेन्सिटिव्ह झोनमधील रिसॉर्ट्स, हॉटेल्स, कॉटेज, रेस्टॉरंट्सच्या बेकायदेशीर बांधकामांवर आणि काणकोणच्या किनारी पट्ट्यात परवानगी मर्यादेपलीकडे बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
“काणकोणच्या किनारी पट्ट्यात ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी संगीत कार्यक्रम आणि पार्ट्यांवर उच्च न्यायालयाच्या आदेशाची कठोर अंमलबजावणी व्हायला हवी,” असे ते म्हणाले.
वैष्णव पेडणेकर यांनी काणकोण किनारी पट्ट्यातील वेश्याव्यवसाय रोखण्यासाठी काणकोण किनारी पट्ट्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या सर्व मसाज पार्लरवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
“काणकोणच्या फुटपाथ आणि किनारपट्टीवरील भागात लामाणी आणि काश्मिरींनी केलेले सर्व अतिक्रमण त्वरित हटवावे आणि पर्यटकांना विनाकारण त्रास देण्यास बंदी घालावी. पर्यटकांना असे त्रास केल्यास ते पुन्हा इते येणार नाही. यासाठी अशा बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करा,‘ अशी मागणी त्यांनी केली.
संबंधित सरकारी अधिकाऱ्यांनी बाहेरील लोकांच्या बेकायदेशीर गोष्टींवर कारवाई न केल्यास काणकोणच्या किनारी पट्ट्यातील बाहेरील लोकांच्या बेकायदेशीर गोष्टींचा पर्दाफाश करू, असा इशारा त्यांनी दिला.
“बाहेरील लोकांच्या बेकायदेशीर विरोधात आमच्या मोहिमेदरम्यान काही वाईट घटना घडल्यास त्याला राज्य सरकार पूर्णपणे जबाबदार असेल,” असे ते म्हणाले.