Apple चे CEO टिम कुक यांनी घेतली PM मोदींची भेट
अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी बुधवारी संध्याकाळी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी टीम कुक यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान त्यांच्यात सध्याच्या युगात तंत्रज्ञानाच्या विस्तारावर चर्चा झाली. टीम कुक यांनी पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतरचा फोटो शेअर केला आहे.
टीम कुक यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, हार्दिक स्वागतासाठी मोदीजींचे आभार. आम्ही दोघांनीही भविष्यात तंत्रज्ञानाच्या सकारात्मक परिणामांबद्दलची दृष्टी सामायिक केली. शिक्षण, विकासकांपासून उत्पादन आणि पर्यावरणापर्यंत गुंतवणूक वाढवण्यासाठी वचनबद्ध.’
पंतप्रधान मोदींनीही टीम कुक यांच्या ट्विटला उत्तर दिले. टीम कुक यांना भेटून आनंद झाला, असे पंतप्रधान म्हणाले. विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण करताना आणि भारतात होत असलेल्या तंत्रज्ञान-आधारित बदलांवर प्रकाश टाकताना आनंद झाला, असेही पंतप्रधान म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधानांना भेटण्यापूर्वी अॅपलच्या सीईओने केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. टीम कुक यांनी भारतातील आयफोन निर्मिती, इलेक्ट्रॉनिक्स निर्यात, अॅपची अर्थव्यवस्था आणि विशेषतः महिलांसाठी रोजगाराच्या समस्यांवर चर्चा केली.