google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

‘गोवा राज्य चित्रपट महोत्सव की गोमंतकीय कलाकारांचे योजनाबद्ध खच्चीकरण?’

मडगाव :

गोवा राज्य चित्रपट महोत्सव – २०२५ साठी जाहीर केलेली पात्रता अटी फक्त निराशाजनक नाहीत, तर लाजीरवाण्या आहेत. फक्त १५ टक्के गोमंतकीय कलाकार आणि १५ टक्के प्रमुख तंत्रज्ञ अशी अट ठेवून उर्वरित ८५ टक्के बाहेरच्या कलाकारांना दारे उघडी आणि तरीही या चित्रपटांना “गोमंतकीय चित्रपट” म्हणायचे? हे स्थानिक कलाकारांचे सशक्तीकरण नव्हे, तर त्यांचे योजनाबद्ध खच्चीकरण आहे, असा आरोप गोवा मनोरंजन संस्थेचे माजी कार्यकारी मंडळ सदस्य विशाल पै काकोडे यांनी केला.


“मी पंधरवड्यामागे एका स्थानिक मिडिया चॅनलच्या सार्वजनिक चर्चेत आणि त्यानंतर प्रसिद्ध केलेल्या लेखातून गोवा राज्य चित्रपट महोत्सवाबद्दल विषय जोरदारपणे मांडल्यावरच सरकार जागे झाले आणि गोवा राज्य चित्रपट महोत्सव २०२५ आयोजित करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय स्वागतार्ह असला, तरी तो मनापासून, दूरदृष्टीने आणि पारदर्शक पद्धतीने अमलात आणायला हवा, केवळ ‘सोपस्कार’ म्हणून नव्हे,” असे पै काकोडे म्हणाले.

https://x.com/VCacodo/status/1934868287684506075?t=8NpHvRuBW22VFj34Y-j1-w&s=19


अजून एक धक्कादायक बाब म्हणजे यंदाच्या महोत्सवासाठी वापरल्या जात असलेल्या अटी गोवा राज्य चित्रपट महोत्सव नियमावली २०१४ वर आधारित आहेत. या नियमांनुसार केवळ २०१० पूर्वीचे सर्टिफिकेट आणि निर्मिती तारीख ग्राह्य धरली जाते, जी आजच्या काळात पूर्णपणे अप्रासंगिक आहे. इतकेच नव्हे, तर ऑगस्ट २०२५ मध्ये १० वा, ११ वा आणि १२ वा महोत्सव आयोजित केला जाणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे, पण अद्यापही जुन्या नियमावलीचा आधार घेतला जात आहे. हे म्हणजे नव्या पिढीच्या गोमंतकीय सिनेउद्योगाचा सरळ अपमान आहे, असेही त्यांनी नमूद केले.


गोव्यात शेवटचा राज्य चित्रपट महोत्सव जवळपास एक दशकापूर्वी झाला होता. त्यानंतर सरकारने स्थानिक सिनेक्षेत्राशी सातत्याने संवाद साधण्याचा किंवा त्यांना प्रोत्साहन देण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. आता अचानक महोत्सव जाहीर करून जुने नियम लागू करणे हा केवळ एक ‘पब्लिसिटी स्टंट’ आहे आणि तोही अतिशय अयशस्वी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

“गोमंतकीय चित्रपटसृष्टीला वगळून गोवा राज्य चित्रपट महोत्सव पुन्हा सुरू करता येणार नाही. खरं तर हा महोत्सव म्हणजे स्थानिक कलाकार, तंत्रज्ञ, लेखक, दिग्दर्शक यांना प्रोत्साहन देण्यासाठीचा एक महत्त्वाचा मंच असायला हवा. जर गोमंतकीय ओळख फक्त १५ टक्क्यांमध्ये मर्यादित केली जाणार असेल, तर आपण नेमकं काय साजरं करतोय?” असा थेट सवाल विशाल पै काकोडे यांनी केला.


“गोवा राज्य चित्रपट महोत्सव नियमावली पूर्णतः नव्याने तयार करण्यात यावी, आणि ती तयार करताना गोमंतकीय सिनेक्षेत्रातील सर्व संबंधित घटकांशी सल्लामसलत करण्यात यावी. ही नियमावली वास्तवाला धरून, स्थानिक प्रतिभेला प्रोत्साहन देणारी आणि गोमंतकीय चित्रपटांची ओळख जपणारी असावी. अन्यथा हा महोत्सव म्हणजे एक खोखला सोहळा ठरेल,” अशी ठाम मागणी विशाल पै काकोडे यांनी केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!