
बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार हा कायमच विविध कारणांनी चर्चेत असतो. बॉलिवूडमधील आघाडीचा कलाकार म्हणून त्याला ओळखले जाते. पण त्याच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व असल्याने अनेकदा टीका झाली आहे. पण आता अखेर अक्षय कुमारला भारताचे नागरिकत्व प्राप्त झाले आहे. त्याने स्वत: पोस्ट करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे.
अक्षय कुमारने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ट्विटरवर एक ट्वीट केले आहे. त्यात अक्षयने भारतीय नागरिकत्व प्राप्त झाल्याची गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. “मन आणि नागरिकत्व दोन्हीही हिंदुस्तानी. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. जय हिंद”, असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.
Dil aur citizenship, dono Hindustani.
Happy Independence Day!
Jai Hind! 🇮🇳 pic.twitter.com/DLH0DtbGxk— Akshay Kumar (@akshaykumar) August 15, 2023
अक्षय कुमारला भारतीय नागरिकत्व प्राप्त झाल्यानंतर सिनेसृष्टीतील अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तर अक्षयच्या काही चाहत्यांनी ‘ट्रोल करणाऱ्यांची तोंड कायमची बंद झाली’, अशा कमेंट करत त्याचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान अक्षय कुमारकडे याआधी कॅनडाचं नागरिकत्व होते. अक्षयच्या कॅनेडियन नागरिकत्वावरुन त्याला कॅनडा कुमार असंही म्हटलं जायचं. त्यावेळी अक्षयने कॅनेडियन नागरिकत्व का स्वीकारले, याबद्दल स्पष्टीकरण दिले होते.
“अनेक वर्षांपूर्वी माझे चित्रपट चांगले चालत नव्हते. माझे जवळपास १४-१५ चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. त्यावेळी मला असे वाटलं की मी कुठेतरी दुसरीकडे काम करायला हवे. यानंतर मी माझ्या कॅनडामध्ये राहणाऱ्या मित्राला फोन केला. त्यावेळी त्याने मला कॅनडामध्ये स्थायिक हो असा सल्ला दिला. हल्ली बरेच लोक कामाच्या निमित्ताने कॅनडामध्ये येत आहेत आणि त्यातील बहुतांश भारतीय आहेत. त्यानंतर मला असं वाटलं की माझे नशीब मला साथ देत नाही. त्यासाठी मला काही तरी करणं गरजेचे आहे. मी तिथे कॅनडामध्ये गेलो. नागरिकत्वासाठी अर्ज केला आणि ते मिळाले.” असे अक्षयने त्यावेळी सांगितले होते. पण आता मात्र अक्षयला भारतीय नागरिकत्व प्राप्त झाले आहे.