पणजी :
आसामचे भ्रष्ट मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’वर नियोजित हिंसक हल्ल्याचा निषेध करत गोवा प्रदेश काँग्रेस समितीने मंगळवारी त्यांचा पुतळा जाळला आणि निषेध केला.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर, आमदार कर्लूस फॅरेरा, वरिष्ठ उपाध्यक्ष एम के शेख, मीडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, गोव्याचे अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अल्पसंख्याक प्रभारी तरन्नुम खान, युवा अध्यक्ष जॉयल आंद्रादे आणि एनएसयुआय अध्यक्ष नौशाद चौधरी, तसेच इतर नते उपस्थित होते.
काँग्रेस हाऊस-पणजी येथे हिमंत बिस्वा सरमा यांचा पुतळा जाळण्यात आला. यावेळी काँग्रेस समर्थक आणि नेत्यांनी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मणिपूरपासून सुरू झालेल्या ‘भारत जोडो, न्याय यात्रेला राहुल गांधींना पाठिंबा मिळत असल्याने भाजपा घाबरला असल्याचा आरोप अमित पाटकर यांनी केला.
‘‘आम्हाला मिळत असलेला पाठिंबा आणि सरकार विरुद्ध लोकांची नाराजी बघता भाजप घाबरला आहे हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गोंधळलेल्या आसामच्या मुख्यमंत्र्यांनी यात्रेवर हल्ला केला आणि त्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला,” असे ते म्हणाले.
https://fb.watch/pLqrJnlE3B/?mibextid=UyTHkb
पाटकर म्हणाले की, आसाममधील काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्र्यांचा भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला आहे आणि त्यामुळे ते गोंधळलेले आहेत. “आमचे आसामचे अध्यक्ष भूपेन कुमार बोराह यांच्यावर हल्ला करून त्यांना मारहाण करण्यात आली. एकीकडे ते रामराज्या विषयी बोलतात आणि दुसरीकडे त्यांनी राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखले,’’ असे ते म्हणाले.
“आमचे नेते राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप करत आहे कारण ते लोकांच्या समस्या मांडत आहेत. आसाममध्ये ‘भारत जोडो, न्याय यात्रे’वर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो,” असे पाटकार म्हणाले.
कार्लूस फॅरेरा म्हणाले की, राहुल गांधी लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर आसाममध्ये भाजप यात्रेत अडथळा आणत आहे. “त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखले गेले. काँग्रेस मजबूत होईल या भीतीने त्यांना थांबवण्यात आले,” असे ते म्हणाले.
आसामचे मुख्यमंत्री हुकूमशाही शासन चालवत आहेत असा आरोप त्यांनी केला.
आसाम सरकार सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरले असून यात्रेवर झालेल्या हल्ल्याबद्दल त्यांनी माफी मागावी, असे तरन्नुम खान यांनी म्हटले आहे.