गोवा

ज्येष्ठ पत्रकार अनिल पै यांचा ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सत्कार

मडगाव :

ज्येष्ठ पत्रकार, शिक्षक आणि कलाकार अनिल वसंत पै यांचा रविवारी १६ एप्रिल २०२३ रोजी श्री अश्वथ नारायण सभागृह, मोखर्ड-काणकोण येथे त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमीत्त आयोजित “अमृत महोत्सव” कार्यक्रमात पै कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य लक्ष्मीबाई पै यांच्या हस्ते कुटुंबातील सदस्य आणि शुभचिंतक यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, अॅड. राधाराव ग्रासियस, एम के शेख, रत्नाकर नेवरेकर, अण्णा नार्वेकर, विनय नायक आणि इतरांनी अनिल पै यांचे याप्रसंगी अभिनंदन केले आणि त्यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

अमृत महोत्सव सोहळ्याची सुरुवात शनिवार 15 एप्रिल रोजी श्री अश्वथ नारायण मंदिरात हंसा आणि अनिल पै यांच्या हस्ते महापूजेने झाली.


माझ्या कुटुंबातील तीन पिढ्यांचे अनिल पै यांच्याशी नाते आहे. माझे वडील दिवंगत बाबू नायक यांच्यापासून सुरू झालेले हे नाते आजही कायम आहे. अनिल पै यांनी मठग्रामस्थ हिंदू सभेसाठी मोठे योगदान दिले आहे आणि आमच्या शैक्षणिक संस्थांच्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे, असे मठग्रामस्थ हिंदू सभेचे अध्यक्ष पांडुरंग उर्फ भाई नायक यांनी यावेळी बोलताना सांगितले.


अनिल पै हे श्री गोकर्ण पर्तगाळी मठाचे एकनिष्ठ मठानुयायी आहेत. त्यांच्या या अमृत महोत्सवी वर्षात त्यांची मठातील सेवेची दखल घेण्याची गरज आहे. मी परमपूज्य विद्याधीश तीर्थ स्वामीजींना नम्रपणे विनंती करेन की त्यांनी अनिल पै यांना मठातर्फे दिला जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करावे, असे विशाल पै काकोडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.


यावेळी बोलताना माजी मुख्याध्यापक उल्हास पै भाटीकर म्हणाले की ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत केणी तसेच धुरंधर राजकारणी अनंत उर्फ बाबू नायक यांचे मार्गदर्शन लाभलेले अनिल पै हे गोवा आणि इतर राज्यांमध्ये “काणकोणकरांचे राजदूत” आहेत.


माजी मुख्याध्यापक विनय कुंकळयेकर यांनी अनिल पै यांनी हाताळलेल्या कोणत्याही जबाबदारीसाठी त्यांनी केलेल्या मेहनतीबद्दल आणि समर्पणाबद्दल त्यांचे कौतुक केले. सामाजिक कार्यात पतीची साथ दिल्याबद्दल त्यांनी पत्नी हंसा यांचेही अभिनंदन केले. यावेळी माजी जिल्हाधिकारी गोकुळदास नाईक यांचेही भाषण झाले.

तत्पूर्वी अनिल पै यांचा कुटूंबातील ज्येष्ठ सदस्य लक्ष्मीबाई पै यांच्या हस्ते श्री अश्वथ नारायणाची मूर्ती देवून त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांची नात अनघा हिने पसायदानाचे पठण केले तर उर्वशी आणि वेदांत पै यांनी त्यांच्या काकांच्या जीवनातील योगदानाबद्दल सांगितले. सुभाष पै यांनीही अनिल पै यांना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा देत “मृत्युंजय जप” पठन केले.


कार्यक्रमाची सुरुवात अनिल पै यांच्या नातेवाईक व मित्रांनी 75 दीप प्रज्वलन करून केली. कन्या स्नेहा रोहन नाडकर्णी यांनी स्वागत केले तर जावई रोहन नाडकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे शिरीष पै यांनी अनिल पै यांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
%d bloggers like this: