google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘पल्लवी धेंपेनी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील रुग्णांच्या जखमांवर मीठ चोळले आहे’

मडगाव :

मी तुम्हाला आव्हान देते की तुम्ही माझ्यासोबत दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात या आणि रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना भेडसावणाऱ्या भयानक त्रासांचा थेट अनुभव घ्या असे आव्हान पल्लवी धेंपेना देत, दक्षिण गोव्याला तळागाळातील नेत्याची गरज आहे, मोदींच्या लाऊडस्पीकरची नाही, असा जबरदस्त टोला काँग्रेस नेत्या आणि जिल्हा पंचायत सदस्य मिशेल रिबेलो यांनी हाणला आहे.


दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय पूर्णपणे सुसज्ज असल्याचा दावा करणाऱ्या भाजपच्या दक्षिण गोव्यातील उमेदवार पल्लवी धेपेंच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रिया देताना मिशेल रिबेलो यांनी तिला भाजपच्या ट्रोल्समार्फत तिच्या हँडलवरून काहिही पोस्ट करण्यापुर्वी सत्यता पडताळून पाहण्याचा सल्ला दिला. पल्लवी धेंपेनी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या रुग्णांच्या जखमांवर मीठ चोळले आहे, असा आरोप मिशेल रिबेलो यांनी केला आहे.


दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय हे “रेफरल रुग्णालय” बनले आहे. जवळपास 15000 रूग्णांना सदर इस्पितळातून गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये आजपर्यंत पाठविले गेले अशी सरकारी आकडेवारीच सांगते. सदर इस्पितळात सुसज्ज आयसीयू आहे का? न्यूरो सर्जरी युनिट कुठे आहे? गेल्या तीन अर्थसंकल्पात सरकारने आश्वासन दिलेले कॅथ लॅब कुठे आहे? असे प्रश्न मिशेल रिबेलो यांनी विचारले आहेत.


आरोग्य सुविधा देण्याचे सोडाच, भाजप सरकारने डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांच्या जागाही भरलेल्या नाहीत. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ पूर्णपणे सुसज्ज असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध करण्याचे आव्हान पल्लवी धेंपेनी स्विकारावे असे आव्हान मिशेल रिबेलो यांनी दिले आहे.

बेरोजगारी, महागाई, म्हादई, पर्यावरण या विषयांवर पूर्ण अज्ञान दाखवल्यानंतर आता भाजपने आयात केलेल्या उमेदवाराने पुन्हा एकदा गोमंतकीयांचा, विशेषतः दक्षिण गोव्यतील जनतेचा अपमान केला आहे. पल्लवी धेंपेनी आजपर्यंत एकदाही दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाला भेट दिली नसेल याची मला खात्री आहे, असा दावा मिशेल रिबेलो यांनी केला.


दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ हा काँग्रेस सरकारचा दूरदर्शी प्रकल्प होता. 2012 मध्ये रुग्णालयाचे बांधकाम जवळपास 70 टक्के पूर्ण झाले होते, परंतु भाजप सरकारला संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यासाठी पूढची आठ वर्षे लागली. माझी माहिती शंभर टक्के खरी हे मडगावचे पक्षबदलू आमदार दिगंबर कामत हे सुद्धा मान्य करतील, असे मिशेल रिबेलो यांनी सांगितले.

भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपेना  भाजपच्या ट्रोल आर्मीने जाळ्यात अडकवल्याबद्दल मला खरोखरच वाईट वाटत आहे. संसदेत आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी व्हॉईस ऑफ मोदी नव्हे तर व्हॉईस ऑफ गोव्याची गरज आहे. तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे, पल्लवी धेंपेनी  सर्व पीडित रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आता ते सर्वजण भाजपला धडा शिकवतील, असे मिशेल रिबेलो यांनी म्हटले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!