‘कळसा भंडुराचा डीपीआर मागे घेण्यासाठी केंद्राला भाग पाडा’
मडगाव :
काँग्रेस पक्षाचा शानदार विजय आणि भाजपच्या कर्नाटकातील दारुण पराभवाने गोव्यातील भाजपला गाढ झोपेतून बाहेर पडण्यास भाग पाडले आणि केंद्रातील भाजप सरकारने कर्नाटकच्या कळसा भंडुरा प्रकल्पाचा मंजूर केलेला डीपीआर बेकायदेशीर असल्याचा साक्षात्कार झाला. मगरीचे अश्रू ढाळणे थांबवा आणि सदर डीपीआर मागे घेण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारला भाग पाडा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
गोव्यातील भाजपच्या राज्य कार्यकारिणी समितीने मंजूर केलेल्या राजकीय ठरावावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ” सामान्य माणूस त्रस्त व हलाकीचे जीवन जगत असताना उत्सव साजरे करण्याचे भाजपला वेड लागले आहे” असा सणसणीत टोला हाणला आहे.
गोव्यातील भाजप जर गंभीर असेल तर त्यांनी दिल्लीतील पहिल्या ट्रबल इंजिनवर कळसा भंडुरा प्रकल्पाच्या डीपीआरला दिलेली मान्यता मागे घेण्यासाठी आणि यथास्थिती कायम ठेवण्यासाठी दबाव आणावा. भाजपने जुमला राजकीय विधाने करून जनतेला मूर्ख बनवण्याचे दिवस आता संपले आहेत. भाजप कार्यकारिणीचा ठराव पूर्णपणे राजकीय असून त्यात प्रामाणिकपणाचा अभाव आहे, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
श्रेय लाटण्याची सवय लागलेल्या भाजपने पुन्हा एकदा अशा गोष्टीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे, जी कदाचित आणखी काही वर्षे प्रत्यक्षात उतरणारच नाही. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीने गोव्यातील खाणकामांच्या प्रत्यक्ष सुरुवातीची तारीख जाहीर करण्याचे का टाळले असा प्रश्न विचारुन, युरी आलेमाव म्हणाले की भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्यांनी काही खाण ब्लॉक्सचा ई-लिलाव झाल्यानंतरही गोव्यात खाणकामास प्रत्यक्ष सुरूवात होण्यास कोणते अडथळे येणार यावर गृहपाठ करणे आवश्यक आहे.
भाजप प्रदेश कार्यकारिणीने एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे अभिनंदन करणाऱ्या अभिनंदन प्रस्तावाचा संदर्भ देत विरोधी पक्षनेते म्हणाले की, भाजपला सदर प्रस्तावात “अभूतपूर्व जनादेश” हे शब्द वापरायला लाज वाटली पाहिजे. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ 32 टक्के मते मिळाली आणि सरकारने विश्वासघातकी आणि पक्षांतर करणाऱ्यांच्या मदतीने जनतेचा जनादेश लुटला असे युरी आलेमाव म्हणाले.
भाजपच्या कार्यकारीणी ठरावातील राज्यात नियोजित G20 गट बैठकींच्या उल्लेखावर आपली प्रतिक्रिया देताना, युरी आलेमाव यांनी “भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1983 मध्ये कॉमनवेल्थ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट मीटिंग (चोगम) च्या रिट्रीटचे आयोजन करून गोव्याला आंतरराष्ट्रीय स्थरावर नेले होते हे भाजपने समजून घेतले पाहिजे असा सल्ला दिला.