काँग्रेसच्या “हाथ से हाथ जोडो” आणि “म्हादई जागोर” मोहीमेस प्रारंभ
पणजी:
गोवा प्रदेश काँग्रेस समितीने 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनी, अखिल भारतीय काँग्रेसचे निरीक्षक डॉ. साके शैलजानाथ, गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अमित पाटकर व दक्षिण गोवा खासदार फ्रांसिस सार्दिन यांच्या उपस्थितीत गोव्यात “हात से हाथ जोडो” आणि “म्हादई जागोर” मोहिमेची सुरुवात पणजी येथील ऐतिहासिक आझाद मैदानावरुन केली. 100 दिवस चालणारी ही मोहीम गोव्यातील प्रत्येक मतदारसंघातील कॉंग्रेस गट राबविणार आहेत.
30 जानेवारी 2023 रोजी गोव्यातील चाळीसही मतदारसंघातील प्रत्येक बूथवर भारतीय राष्ट्रध्वज फडकवला जाईल आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या पुण्यातिथी निमीत्त श्रद्धांजली अर्पण केली जाईल. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीदिनीच श्रीनगरमध्ये भारत जोडो यात्रेचा समारोप होणार आहे.
आमचे नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतच्या लोकांशी संवाद साधला. 3500 किलोमीटरच्या भारत जोडो यात्रेदरम्यानच्या अनुभवावर आधारित त्यांनी भारतातील प्रत्येक नागरिकाला पत्र पाठवले आहे. भाजप सरकारविरोधातील आरोपपत्रासह राहुल गांधींचे पत्र आणि आमची माता म्हादई वाचवण्याचे महत्त्व देणारे माहितीपत्रक गोव्यातील प्रत्येक घराघरात पोहोचेल याची खात्री करणे हे आपले कर्तव्य आहे. मी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना या मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करतो, असे काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
भारत जोडो यात्रा ही देशातील जनतेला भेडसावणारी सततची महागाई, बेरोजगारी आणि इतर समस्यांविरोधात जनजागृती करण्यासाठी होती. आमचे नेते राहुल गांधी यांनी यात्रेदरम्यान अनेक विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, शेतकरी, खेळाडू, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर अनेकांबरोबर संवाद साधून लोकांच्या भावना व समस्या समजण्याचा प्रयत्न केला. ही ऐतिहासिक यात्रा निश्चितच भारताला एकसंध करेल आणि फुटीरतावादी शक्तींना दूर ठेवेल. “हाथ से हीथ जोडो” अभियान सुरू केल्याबद्दल मी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की गोव्यात ही मोहिम खूप यशस्वी होईल, असे कॉंग्रेसचे निरीक्षक डॉ. साके शैलजानाथ यांनी सांगितले.
दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसिस सार्दिन यांनी मोठ्या संख्येने जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना सर्व कार्यकर्त्यांनी गोव्याच्या कानाकोपऱ्यात काँग्रेस विचारसरणीचा प्रसार करण्याचे आवाहन केले. माणुसकी हाच धर्म मानणे महत्त्वाचे असून प्रत्येकाने प्रेमाचा प्रसार केला पाहिजे, असे ते म्हणाले.
ज्येष्ठ उपाध्यक्ष एम.के. शेख, वाळपई काँग्रेस नेत्या मनीषा उजगावकर, दक्षिण गोवा संयोजक सुभाष फळदेसाई, उत्तर गोवा संयोजक विजय भिके यांनीही या सभेला संबोधित केले. काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी सूत्रसंचालन केले तर दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी आभार मानले.
काँग्रेस नेते राजेश वेरेंकर, कॅप्टन विरिएटो फर्नांडिस, विकास प्रभुदेसाई, लवू मामलेदार, वरद म्हार्दोळकर, जितेंद्र गावकर, नितीन चोपडेकर, विरेंद्र शिरोडकर, ऑर्विल दौरादो, प्रदिप नाईक, एव्हरसन वालिस, सावियो डिसोझा आणि जवळपास ३०० कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.