google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘लोकांचे आरोग्य सांभाळणे माझे कर्तव्य’

मडगाव :

ही तर फक्त सुरुवात आहे. ५ डिसेंबर २०२२ रोजी दिलेल्या माझ्या तक्रार पत्राची दखल घेत, गोवा राज्य तज्ञ मूल्यमापन समितीने आता मेसर्स ऑरेंज फॉक्स स्टील प्रा. लिमीटेड हा कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील कारखाना बंद करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती विरोधी पक्षनेते व कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी दिली आहे.



कुंकळ्ळी औद्योगीक वसाहतीत कार्यांवीत असलेल्या सर्व बेकायदेशीर आणि प्रदूषणकारी कारखान्यांना हा एक संदेश आहे. लोकांचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. खूप उशीर होण्याआधी इतर बेकायदेशीर आणि प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांविरोधात सक्रियपणे कारवाई करावी, अशी मी पुन्हा एकदा सरकारी अधिकाऱ्यांना विनंती करतो, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

बेकायदेशीरपणे कार्यरत असलेला पोलाद कारखाना बंद करण्याच्या गोवा राज्य तज्ज्ञ मूल्यांकन समितीने गोवा राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाला केलेल्या शिफारशीवर प्रतिक्रिया देताना, कुंकळ्ळीचे आमदार म्हणाले की, असे सर्व कारखाने व आस्थापने कायमची बंद होईपर्यंत आपण शांत बसणार नाही.



गेल्या कित्येक वर्षांपासून कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील विविध पोलाद कारखाने आणि फिश मिल्सच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे कुंकळ्ळीच्या रहिवाशांना वायू आणि जल प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. सरकारी प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी माझ्याद्वारे उठवलेल्या धोक्याच्या घंटेची दखल घेतली आणि त्वरीत कारवाई केली याचे मला समाधान आहे. सरकारी अधिकारी यापुढेही दक्ष राहतील आणि सर्व प्रदूषणकारी कारखाने कायमस्वरूपी बंद करतील अशी आशा बाळगतो असे युरी आलेमाव म्हणाले.

स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीची स्थापना केली. दुर्दैवाने, विद्यमान सरकारने औद्योगिक आस्थापनांना बेकायदेशीरपणे काम करण्यास परवानगी दिली. आता कुंकळ्ळीत नोकऱ्या उपलब्ध नाहीत, पण प्रदूषण मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, असा टोला युरी आलेमाव यांनी हाणला आहे.


सरकारने विवीध खात्यांमार्फत सर्व विभाग सक्रिय करावेत आणि कुंकळ्ळी औद्योगीक वसाहतीतील कारभारावर बारीक लक्ष ठेवावे. मर्यादेपलीकडे बेकायदेशीर उत्पादन करून राज्याच्या महसुलाचे मोठे नुकसान करत असलेल्या आस्थापनांविरूद्ध कारवाई होणे गरजेचे असल्याचे युरी आलेमाव यांनी म्हटले असून त्यासाठी प्रभावि देखरेख यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!