चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी झाली विजय दिवसाची सांगता
कराड (अभयकुमार देशमुख) :
बांग्लामुक्ती लढय़ातील भारतीय सेनेच्या विजयाप्रित्यर्थ कराडमध्ये गेल्या 24 वर्षांपासून साजऱ्या होणाऱ्या विजय दिवस समारोहाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष होते. शुक्रवार दि. १६ रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर या रौप्यमहोत्सवी विजय दिवस समारोहाची चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी मोठ्या उत्साहात सांगता झाली.
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर शुक्रवारी दुपारी 2 वाजता विजय दिवस समारोहाचे मुख्य आकर्षण असलेल्या दिमाखदार सोहळ्यास देशाचे माजी संरक्षणमंत्री व कृषीमंत्री खा. शदार पवार यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. यावेळी सिक्कीमचे राज्यपाल खा. श्रीनिवास पाटील, माजी सहकारमंत्री आ. बाळासाहेब पाटील, विजय दिवस समारोह समितीचे संस्थापक निवृत्त कर्नल संभाजी पाटील, सचिव अॅड. संभाजीराव मोहिते, समितीचे विनायक विभुते, प्रा. बी. एस. खोत, सहसचीव विलासराव जाधव, माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव आदी. मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती होती.
या दिमाखदार सोहळ्याचे बोफर्स तोफ, मल्लखांब, मार्शल आर्ट, डॉग शो ठरले आदी. मुख्य आकर्षण ठरले. यामध्ये २५ मराठा लाईफ इंन्प्फंट्री, आर्मी विभाग, पुणेच्या जवानांनी डॉग शो सादर केला. यामध्ये श्वानांच्या कवायती आणि शत्रूवर हल्ला चढवण्याची थरारक प्रथाक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कराडच्या जगदंबा ढोल ताशा पथकाने अत्यंत सुंदर सादरीकरण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांनतर या सोहळ्यातील मुख्य आकर्षण असलेल्या मराठा लाईफ इंन्प्फंट्री २३-२४ केरळ व महाराष्ट्रच्या जवानांनी चित्तथरारक मल्लखांब प्रथाक्षिके सदर केली. त्याला उपस्थित प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
त्यानंतर अरुणाचल प्रदेशच्या महिला भगिनींनी अरुणाचलच्या प्रसिद्ध फोक डान्सचे सादरीकरण केले. तर शिक्षण मंडळ कराडचे आत्माराम विद्यालय, ओगलेवाडीच्या विद्यार्थ्यांनी लेझिम खेळाचे अत्यंत उत्कृष्ट सादरीकरण केले. २४ मराठा लाईफ इंन्प्फंट्री, पुणे व त्रिशक्ती फाऊंडेशन, पुणेच्या जवानांनी लक्षवेधी पाईप बँड डिस्प्लेचे सादरीकरण केले. तसेच अरुणाचल प्रदेशच्या महिला भगिनींनी देशभक्तीपर गीत सादर केले.
त्यांनतर विजय दिवस समारोहाचे दुसरे खास आकर्षण ठरलेल्या पंजाब राज्यातील शीख बांधवांनी तेथील प्रसिद्ध गतका मार्शल आर्टचे चित्तथरारक व अत्यंत लक्षवेधी सादरीकरण केले. त्यामध्ये तलवारबाजी, ढाल तलवार, संरक्षक गोळा व अग्नि गोळा प्रात्यक्षिक, तसेच भाला, टोकदार खिल्यांवरील कवायती, लांब पल्ल्याच्या दांडपट्ट्यासह सदर केलेल्या विविध चित्तथरारक मर्दानी खेळांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्यांच्या सर्वच प्रत्याक्षिकांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. तर उपस्थित प्रत्येकासाठी कुतूहल बनेलेल्या भारत-पाकिस्तान कारगिल युद्धात वापरलेल्या व या युद्धात शत्रूचा कर्दनकाळ ठरलेल्या बोफर्स तोफेचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी ‘भारत माता की जय’, वंदे मातरम् आदी. घोषणांनी संपूर्ण छत्रपती शिवाजी स्टेडीयम दणाणून सोडले. त्यानंतर होली फॅमिली, कराडच्या विद्यार्थी बँड पथकाणने प्रात्यक्षिक सादर केले. त्यांनतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
प्रारंभी, शुक्रवारी १६ रोजी सकाळी 8.30 वाजता विजय दिवस समारोहाचा मुख्य दिवशी तळबीड ता. कराड येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळी समितीतर्फे कोल्हापुरचे शाहु महाराज, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, निवृत्त कर्नल संभाजी पाटील, ब्रिगेडीयर जेम्स थॉमस यांनी अभिवादन केले.