गोवादेश/जगमहाराष्ट्र
‘म्हातारेन धांपलो कोंबो, सकाळ जावची रावलीना’
म्हातारेन धांपलो कोंबो, सकाळ जावची रावलीना अशी कोंकणीत एक म्हण आहे. सत्याचाच विजय होतो. लोकांच्या समस्या मांडण्याचा विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कदापी सफल होणार नाही. आम्ही राष्ट्रीय नेते राहुल गांधींच्या सोबत आहोत. त्यांची अपात्रता ही लोकशाहीची हत्या आहे, अशा शब्दांत गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खासदारकीच्या निलंबनावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
तर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. कर्नाटकमधील २०१९ च्या एका सभेतील विधानाचा संदर्भ घेऊन खोटी तक्रार दाखल करत हा निर्णय घेतलेला आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न भाजपा मागील काही दिवसांपासून करत होते. हे सर्व जाणीवपूर्वक आणि ठरवून केलेले असून, खासदारकी रद्द करण्याचा भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा निर्णय हा लोकशाहीचा खून केला आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचे समजात त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. महाविकास आघाडीने या घटनेचा निषेध करत सभात्याग केला व विधानभवनच्या पायऱ्यावर काळ्या फिती लावून मोदी सरकारचा धिक्कार केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण , पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते अजय चौधरी, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यासह मविआचे आमदार उपस्थित होते.