![](https://rashtramat.com/wp-content/uploads/2023/05/bjp-poll-manifesto-780x467.jpg)
मोफत गॅस सिलिंडर आणि प्रतिदिन अर्धा लिटर नंदिनी दूध; भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध
बंगलोर:
कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे १० दिवस उरले आहेत. यामुळे प्रचाराला वेग आला आहे. काँग्रेसकडून राहुल गांधी तर, भाजपाकडून खुद्द नरेंद्र मोदी मैदानात उतरले असल्याने या निवडणुकीची चुरस वाढली आहे. त्यातच, भाजपाने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये शेतकरी, सामान्य नागरिक, व्यावसायिक यांना आश्वासने देण्यात आली आहेत. भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कर्नाटकात जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईही उपस्थित होते.
सत्तेत आल्यास भाजपा दरवर्षी बीपीएल कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलिंडर देणार आहे. युगाडी, गणेश चतुर्थी आणि दिवाळी या तीन सणांना हे सिलिंडर सरकारकडून मोफत असतील.
राज्यभर स्वस्त, दर्जेदार आणि सकस आहार देण्यासाठी भाजपा राज्यातील प्रत्येक महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागात ‘अटल आहार केंद्र’ सुरू करणार. तर, पोषण्णा योजनेअंतर्गत भाजपा बीपीएल कुटुंबांना प्रतिदिन अर्धा लिटर नंदिनी दूध देणार आहे. तसंच, बीपीएल कुटुंबांना ५ किलो श्री अण्णा रेशन किट देण्यात येणार आहे.
भाजपाने कर्नाटकातही समान नागरी कायदा लागू करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. भाजपा ‘सर्वारिगू सुरू योजना’ सुरू करणार आहे. याअंतर्गत महसूल विभाग बेघरांना राज्यभर १० लाख घरांचं वाटप करणार आहे.
भाजपा ‘ओनाके ओबव्वा सामाजिक न्याय निधी’ योजना सुरू करणार आहे. या योजनेचा फायदा एससी, एसटी कुटुंबातील महिलांना होणार आहे.
कर्नाटकातील नागरिकांचं आयुष्य सुधारण्याकरता ‘अपार्टमेंट ओनरशिप कायदा १९७२’ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. तसंच, कर्नाटक रहिवासी कल्याण सल्लागार समितिची स्थापनाही करण्यात येणार आहे.